अधिवेशनात आमदार खरात यांनी वेधले पंकजाताईंचे लक्ष; विषय होता शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याच्या गरजेचा रेटला मुद्दा

अधिवेशनात आमदार खरात यांनी वेधले पंकजाताईंचे लक्ष; 

         विषय होता शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा

दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याच्या गरजेचा रेटला मुद्दा !



मेहकर/वृत्तसेवा 

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा प्रश्न प्रभावीपणे मांडत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंढे यांचे लक्ष वेधले. शेतीला पूरक आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सभागृहात मांडले.

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना खरात यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसायासारखे पूरक उद्योग मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष दुग्ध विकास धोरण राबवावे.

बुलढाणा, वाशीम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील दूध उत्पादनाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्याची मागणी केली. मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी शासनाने युद्धपातळीवर काम करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन केले.

याचवेळी आरोग्य विभागावरील चर्चेतही आमदार खरात यांनी मेहकर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी केली. तसेच मेहकर ट्रॉमा केअर सेंटरसाठी मंजूर पदांवर तातडीने भरती करून केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

डोणगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे तसेच सोनाटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी करत ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!