देऊळगावराजात दोन गटांच्या सशस्त्र संघर्षात दोघांचा मृत्यू प्रकरणी : : परस्परविरोधी गुन्हे दाखल; २० आरोपी अटकेत : : नगरसेवक अन्वर शेख व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आरिफ पठाण यांच्यावर अंत्यसंस्कार
देऊळगावराजात दोन गटांच्या सशस्त्र संघर्षात दोघांचा मृत्यू प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल; २० आरोपी अटकेत नगरसेवक अन्वर शेख व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आरिफ पठाण यांच्यावर अंत्यसंस्कार देऊळगावराजा/वृत्तसेवा : शहरात सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री दोन गटांमध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षाने संपूर्ण शहर हादरले. चाकू, तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या व कुऱ्हाडी यांसारख्या शस्त्रांनी झालेल्या तुफान हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे विद्यमान नगरसेवक शेख अन्वर शेख अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पदाधिकारी आरिफ खान हारून खान पठाण यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा रक्तरंजित संघर्ष देऊळगावराजा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच घडला. या घटनेनंतर देऊळगावराजा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या फिर्यादींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही मृतकांवर देऊळगावराजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ...