पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांची बोट उलटली; सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू, दोन्ही महिला भाविकांवर अंत्यसंस्कार
पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांची बोट उलटली;
सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू,
दोन्ही महिला भाविकांवर अंत्यसंस्कार
माजलगाव (बीड) / वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास यात्रेदरम्यान भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत उलटल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक बालक गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली असून भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेतील दोन्ही मृत महिला भाविकांवर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना आणि बीड जिल्ह्यांच्या सीमेवरील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. याच दरम्यान नदीपात्रातून भाविकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेणारी बोट अचानक उलटली. बोटीत सुमारे ५० हून अधिक भाविक प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या दुर्घटनेत लोणार तालुक्यातील बीबी येथील येथील प्रमिला शेषराव राठोड (वय ५५) आणि सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ येथील कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६०) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून बुडालेला लहान मुलावर उपचार सुरु आहेत.
दुर्घटनेतून बचावलेल्या काही महिलांनी सांगितले की, बोट अचानक असंतुलित झाल्यानंतर काही क्षणांतच पाण्यात उलटली. त्यामुळे अनेक जण नदीच्या खोल पाण्यात फेकले गेले. काही भाविकांना पोहता येत असल्याने त्यांनी स्वतःचा बचाव केला, तर स्थानिकांनीही मदतीसाठी धाव घेत अनेकांचे प्राण वाचवले.
पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तम मंदिर हे देशातील एकमेव मंदिर मानले जाते. अधिक मास यात्रेदरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे नदीपात्रातून होणाऱ्या वाहतुकीवर विशेष ताण येतो. या पार्श्वभूमीवर बोटचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
स्थानिकांच्या मते, बोटींमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जातात. तसेच अनेकदा भाविकांसाठी लाईफ जॅकेटसारख्या मूलभूत सुरक्षा सुविधा उपलब्ध नसतात. प्रशासनाकडून आवश्यक देखरेख आणि सुरक्षा उपाययोजनांमध्येही त्रुटी असल्याचा आरोप केला जात आहे.
या दुर्घटनेनंतर यात्रास्थळी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदी वाहतूक आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसंदर्भात प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ह्या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दोन्ही भाविक महिलांवर आज रात्रीच अंत्यसंस्कार
ह्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कांताबाई ज्ञानोबा आंधळे यांच्यावर कुंबेफळ येथे व प्रमिला शेषराव राठोड यांच्यावर बीबी येथे आज दि. १० जून, बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी कुंबेफळ येथून एकूण सुमारे २२ तर बीबी येथून सुमारे १५ च्या वर महिला भाविक दर्शनासाठी गेल्या होत्या, अशी माहिती मनसेचे स्थानिक नेते राजेश इंगळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या