कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; 

मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला

मृतक शेतकरी कैलास अर्जुन सानप 












सिंदखेडराजा/प्रतिनिधी

सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील शेतकरी कैलास अर्जुन सानप (वय ४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच कैलास सानप यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचे मोठ्या आनंदात लग्न लावून दिले होते. तालुक्यातील उमरद येथे मुलीचा संसार थाटून दिल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, त्या आनंदाला नियतीची दृष्ट लागली आणि महिन्याभरातच कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शेतीवरील आर्थिक संकट, वाढते उत्पादन खर्च आणि बँकेचे कर्ज यामुळे कैलास सानप मानसिक तणावाखाली होते. मुलीच्या लग्नाची जबाबदारी पार पाडल्यानंतरही आर्थिक विवंचना कमी झाली नाही. अखेर या तणावातूनच त्यांनी जीवन संपविल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कैलास सानप यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, विवाहित मुलगी, भाऊ व इतर नातेवाईक असा परिवार आहे. घरातील आधारवड निघून गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांसह शेतकरी बांधवांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच कैलास सानप यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली...
एकुलत्या एक मुलीचे हात पिवळे करून तिच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणारा बाप, स्वतःच्या आयुष्याशीच हरला. बळीराजाच्या या वेदनादायी अंताने संपूर्ण परिसर हळहळला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!