मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान; शहीद जवान अंकुश महादेव मिसाळ अनंतात विलीन; मेहुणाराजा गावातील वीरपुत्राला हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप
मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान;
शहीद जवान अंकुश महादेव मिसाळ अनंतात विलीन
मेहुणाराजा गावातील वीरपुत्राला
हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप
मेहुणाराजा (ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) :-
जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावताना वीरमरण आलेले भारतीय सैन्याच्या ३३ मिडीयम रेजिमेंटमधील हवालदार अंकुश महादेव मिसाळ हे मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत अनंतात विलीन झाले.
सोमवारी (दि. २९ जून) दुपारी सुमारे २ वाजता त्यांच्या मूळ गावी मेहुणाराजा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सैन्य अधिकारी उपस्थित राहून या वीरपुत्राला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
देऊळगावराजा तालुक्यातील संत चोखामेळा महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहुणाराजा गावचे सुपुत्र अंकुश मिसाळ हे भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत होते. २६ जून २०२६ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह परिसरात शोककळा पसरली होती.
शहीद जवानांचे पार्थिव सोमवारी गावी दाखल होताच संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले. गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आपल्या वीरपुत्राला अखेरचा सलाम केला. "भारत माता की जय", "वंदे मातरम्" आणि "शहीद अंकुश मिसाळ अमर रहें" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर देशासाठी बलिदान दिलेल्या जवानाबद्दल अभिमानाची भावना प्रत्येकाच्या मनात होती.
अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सैन्य दलाच्या जवानांनी शस्त्र सलामी देत शहीद जवानाला मानवंदना अर्पण केली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित नागरिकांनी "जोपर्यंत सूर्य-चंद्र राहतील, तोपर्यंत अंकुश मिसाळ यांचे नाव राहील" अशा भावना व्यक्त केल्या.
शहीद अंकुश मिसाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा रणवीर आणि मुलगी दिव्या असा परिवार आहे. त्यांचे वडील पूर्वीच निवर्तले असून त्यांना दोन बहिणी आहेत. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आपल्या पुत्राचा अभिमानही त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
देशाच्या संरक्षणासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणारे अंकुश महादेव मिसाळ हे बुलढाणा जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेतील आणखी एक तेजस्वी अध्याय ठरले आहेत. त्यांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.
"शहीद अंकुश महादेव मिसाळ अमर रहें!"
भावपूर्ण श्रद्धांजली! 🇮🇳🌹🙏





टिप्पण्या