गीता ज्ञानाच्या नावाखाली अंमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण, आयआयटीयन बाबा अभिषेक मिश्रा अटकेत
गीता ज्ञानाच्या नावाखाली अंमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण,
आयआयटीयन बाबा अभिषेक मिश्रा अटकेत
![]() |
| आरोपी ढोंगी बाबा आयआयटीयन अभिषेक मिश्रा |
नवी दिल्ली/वृत्तसेवा
गीतेचे ज्ञान आणि ऑनलाईन प्रवचनांच्या नावाखाली अंमली पदार्थ देऊन अनेक युवतींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयआयटीयन ढोंगी बाबा अभिषेक मिश्रा याला मथूरा येथून अटक करण्यात आली आहे.
आरोपी ढोंगी साधू अभिषेक मिश्रा याने आयआयटी रुरकीमधून बी.टेक पदवी घेतली आहे. तो साधू असल्याचे भासवून गोवर्धनच्या राधाकुंड परिसरात हे कृत्य करत होता. छत्तीसगडमधील एका युवतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्या तावडीतून इतर दोन युवतींची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपीचे खरे नाव अभिषेक मिश्रा उर्फ आदिकर्ता नारायण दास असून तो मूळचा ओडिशाच्या फोर्डा येथील आहे. त्याचे आई-वडील भुवनेश्वर येथे राहतात. आरोपी अभिषेक मिश्रा गेल्या काही वर्षांपासून गोवर्धनच्या राधाकुंड परिसरात राहत होता. तो ऑनलाईन गीता प्रवचन देऊन आणि आध्यात्मिक सत्रांच्या माध्यमातून युवक-युवतींना आपल्या जाळ्यात ओढत होता. या दरम्यान ढोंगी अभिषेक मिश्रा याने मथूरा येथील आश्रमात राहणाऱ्या युवतींना अंमली पदार्थ देऊन त्यांचे लैंगिक शोषणही केले.
मथूरेत इंटरशीप करत असलेल्या छत्तीसगडमधील एका विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. एका महिलेने आरोप केला आहे, की ती तिच्या बहिणीला भेटायला मथुरेत आली होती. तिथे आरोपीने तिला प्रसाद असल्याचे सांगून दूध दिले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, दूध प्यायल्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि दुसऱ्या दिवशी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विरोध केल्यावर ह्या ढोंगी बाबाने तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोपही महिलेने आरोपी अभिषेक मिश्रा याच्यावर केला आहे.
या प्रकरणी महिलेने आणि पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आणि तपास सुरू केला. त्यानंतर आरोपीला आरोपी ढोंगी बाबा अभिषेक मिश्रा याला राधाकुंड येथील त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तरुणींनाही ताब्यात घेतले असून, त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिलांची मानसिक स्थिती सोबतच प्रकरणाच्या इतर पैलूंची चौकशी केली जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांना गुंगीचे औषध देणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यांना धमक्या देणे या आरोपांप्रकरणी आरोपीची चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की प्रकरणाच्या इतर संभाव्य पैलूंची आणि इतरांच्या भूमिकेचीही चैकशी केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, येथे अनेक मुली होत्या, पंरतू त्या या ढोंबी बाबाच्या दबाव व धमक्यांमुळे विरोधात तक्रार करण्यास त्या पुढे येत नव्हत्या.

टिप्पण्या