एसआयआर मोहिमेत मृत अंगणवाडी सेविकेची नियुक्ती! सिंदखेडराजा तहसीलचा धक्कादायक कारभार उघड; लोकशाही प्रक्रियेची थट्टा?
एसआयआर मोहिमेत मृत अंगणवाडी सेविकेची नियुक्ती!
सिंदखेडराजा तहसीलचा धक्कादायक कारभार उघड; लोकशाही प्रक्रियेची थट्टा?
सिंदखेडराजा:-
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेदरम्यान सिंदखेडराजा तहसील प्रशासनाचा एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदार यादी पुनरिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेत तहसील कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव थेट मदतनीस म्हणून नियुक्ती आदेशात समाविष्ट करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दि. २४ जून २०२६ रोजी जिजाऊ सृष्टी येथे सिंदखेडराजा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएलओंचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक बीएलओंना प्रशिक्षणातील सूचना व मार्गदर्शन व्यवस्थित ऐकूच आले नाही. तरीही केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उपस्थितांच्या सह्या घेऊन प्रशिक्षण यशस्वी झाल्याचे दाखवण्यात आल्याची चर्चा आहे.
याच प्रशिक्षणात मतदार यादीतील दुरुस्त्या आणि पडताळणीसाठी बीएलओंना मदत करण्याकरिता संबंधित गावांतील अंगणवाडी सेविकांची मदतनीस म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार तहसील कार्यालयातून नियुक्ती आदेशही काढण्यात आले. मात्र या प्रक्रियेत कोणतीही शहानिशा न करता यादी तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दुसरबीड येथील भाग क्रमांक २५२ मध्ये तर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही काळापूर्वी निधन झालेल्या अंगणवाडी सेविका शिवगंगा पांडुरंग साबळे यांचे नाव तहसील कार्यालयाने मदतनीस म्हणून नियुक्ती आदेशात समाविष्ट केले आहे. हा प्रकार समोर येताच बीएलओंसह विविध स्तरांवर आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
लोकशाही प्रक्रियेचा पाया मानल्या जाणाऱ्या मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत अशी गंभीर चूक होणे म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका होत आहे. प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी न करता केवळ कागदोपत्री कामे उरकण्याची तहसील कार्यालयाची कार्यपद्धती पुन्हा एकदा उघडी पडल्याचे बोलले जात आहे.
मृत व्यक्तीची नियुक्ती करणारे आदेश नेमके कोणी तयार केले? यादीची पडताळणी कोणी केली? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
दरम्यान, ही गंभीर चूक लक्षात आल्यानंतर तहसील प्रशासन मृत अंगणवाडी सेविकेचे नाव तत्काळ वगळून सुधारित आदेश काढणार की नेहमीप्रमाणे हा विषयही दाबला जाणार, याकडे सर्व बीएलओ व नागरिकांचे लक्ष लागले आहे.


टिप्पण्या