अल्पवयीन मुलीवर अत्याचार व चार बालकांच्या हत्याकांडातील आरोपीला फाशी; पोक्सो न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार व चार बालकांच्या हत्याकांडातील आरोपीला फाशी;
पोक्सो न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
जळगाव/वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता. रावेर) येथे घडलेल्या चार बालकांच्या निर्घृण हत्याकांड आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात विशेष पोक्सो फास्ट ट्रॅक न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत मुख्य आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
भुसावळ येथे सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर एखाद्या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याने या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. न्यायालयाने वैज्ञानिक, तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) व कलम 376 (बलात्कार) अंतर्गत दोषी ठरविले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली.
या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेनुसार, बोरखेडा येथील मेताब भिलाला पावरा यांचे कुटुंब एका नातेवाईकांच्या विधीसाठी मध्य प्रदेशात गेले होते. त्यावेळी घरात सविता (वय 13), राहुल (वय 11), अनिल (वय 8) आणि सुमन (वय 6) ही चार लहान मुले एकटी होती. आरोपी महेंद्र बारेला याने कुटुंबाचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरात मुक्काम केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी त्याने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या कृत्याला विरोध करणाऱ्या इतर तीन भावंडांवरही धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. 16 ऑक्टोबर 2020 रोजी हा भीषण प्रकार उघडकीस आला. तपासादरम्यान पोलिसांनी वैज्ञानिक पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले. न्यायालयाने हे सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले.
सरकारी पक्षाचे विशेष वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, फाशीच्या शिक्षेनंतर नियमानुसार हे प्रकरण एका महिन्याच्या आत मुंबई उच्च न्यायालयाकडे पुष्टीकरणासाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर आरोपीला अपील करण्याची संधी उपलब्ध राहील. उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होणार आहे.
या निकालानंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महिलांवरील अत्याचार आणि बालकांविरोधातील अमानुष गुन्ह्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या