टीईटी परीक्षेसाठी नवे नियम लागू; गैरप्रकार रोखण्यासाठी मेटल डिटेक्टर, फेस रिकग्निशन आणि एआय-आधारित देखरेख

टीईटी परीक्षेसाठी नवे नियम लागू; 

गैरप्रकार रोखण्यासाठी मेटल डिटेक्टर, 

फेस रिकग्निशन आणि एआय-आधारित देखरेख



मुंबई/वृत्तसेवा 

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अधिक पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने कडक नियमावली लागू केली आहे. परीक्षा प्रक्रियेत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी उमेदवारांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमेट्रिक नोंदणी, फेस रिकग्निशन प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सीसीटीव्ही देखरेखीचा वापर करण्यात येणार आहे.

नव्या नियमांनुसार परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांचा चेहरा स्पष्टपणे दिसणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे बुरखा, मास्क, टोपी, दुपट्टा किंवा चेहरा झाकणारी कोणतीही वस्तू परिधान करून परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही यंत्रणा आणि चेहरा ओळख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांची ओळख पडताळण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर जाताना आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक छायाचित्रयुक्त मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. मूळ ओळखपत्र नसल्यास उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी आणि फेस रिकग्निशनद्वारे पडताळणी केली जाणार आहे. आवश्यक वाटल्यास संशयित उमेदवारांची आधार पडताळणीही करण्यात येऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने परीक्षा देण्याचा किंवा बनावट ओळख वापरण्याचा प्रयत्न आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता वाढविण्यासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या पानावर स्वतंत्र युनिक क्रमांक आणि क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा मागोवा घेणे आणि कोणत्याही प्रकारची गळती अथवा गैरप्रकार शोधणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत प्रत्यक्ष सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्र आणि परिसरात अत्याधुनिक एआय-आधारित सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असणार असून संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल फोन, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, दिव्यांग उमेदवारांसाठीही नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. लेखनिक (स्क्राइब) म्हणून कुटुंबातील सदस्याची नियुक्ती करता येणार नाही. त्यासाठी संबंधित प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.

टीईटी परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी हे बदल करण्यात आले असून सर्व उमेदवारांनी नव्या नियमांची माहिती घेऊन त्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला