समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नीचा जागीच मृत्यू; मुलगा, मुलगी व चालक गंभीर जखमी; २३ जून, मंगळवार सकाळची घटना
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
पती-पत्नीचा जागीच मृत्यू;
मुलगा, मुलगी व चालक गंभीर जखमी
२३ जून, मंगळवार सकाळची घटना
दुसरबीड/वृत्तसेवा
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी, मुलगा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार, २३ जून रोजी सकाळच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३२६.५ जवळ घडला.
प्राथमिक माहितीनुसार, एमएच-२० एचएन-६७६८ क्रमांकाची टोयोटा फॉर्च्यूनर कार नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी समोर असलेल्या एनएल-०१ एडी-४९८१ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की फॉर्च्यूनर कारचा संपूर्ण पुढील भाग ट्रकच्या मागील बाजूत घुसला. अपघातानंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि प्रवासी आत अडकून पडले.
अपघातात डॉ. सय्यद असिफ सय्यद उमर (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी गुलसितानबी सय्यद असिफ (वय ४५, रा. छत्रपती संभाजीनगर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघेही कारच्या पुढील आसनांवर बसले असल्याची माहिती समोर आली आहे.
तर शेख साजिद शेख फरीद (कार चालक), सबा सय्यद आसिफ (वय १८) आणि सय्यद अजब माज सय्यद असिफ (वय २५) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक यंत्रणा, महामार्ग सुरक्षा पथक, रुग्णवाहिका कर्मचारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
जखमींना प्रथम सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील विशेष रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
पोलीस तपासात ट्रक चालक मोहम्मद इजराऊल हक (रा. झारखंड) याची चौकशी करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, तो नागपूरहून मुंबईकडे माल घेऊन जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या फॉर्च्यूनरने ट्रकला धडक दिली.
वेग आणि निष्काळजीपणा कारणीभूत?
प्राथमिक अंदाजानुसार वाहनाचा वेग जास्त असणे, चालकाचे क्षणिक दुर्लक्ष, तसेच समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर न राखणे ही अपघाताची संभाव्य कारणे मानली जात आहेत. मात्र नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम
समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर अपघात घडले आहेत. अतिवेग, दीर्घ प्रवासामुळे येणारी झोप, थकवा आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात असली तरी अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही.
पोलिसांकडून तपास सुरू
अपघातग्रस्त दोन्ही वाहने महामार्गावरून हटवून दुसरबीड टोलनाक्याजवळ हलविण्यात आली आहेत. किनगाव राजा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळ पंचनामा, वाहनांची तपासणी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम करीत असून पुढील तपास सुरू आहे.
हृदयद्रावक घटना
एकाच कुटुंबातील पती-पत्नीचा मृत्यू आणि मुलगा-मुलगी गंभीर जखमी झाल्याने छत्रपती संभाजीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचे फोटो पाहून धडकेची तीव्रता लक्षात येत असून या दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षित वाहनचालना किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून दिली आहे.

टिप्पण्या