महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा

महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 

२ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्या; 

अन्यथा आंदोलनाचा इशारा

उपविभागीय अधिकारी डॉ संजय खडसे यांना निवेदन देतांना शेतकरी प्रतिनिधीं

सिंदखेडराजा:- राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असला, तरी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अशा शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी डॉ. संजय खडसे यांचे मार्फत सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पुन्हा पीककर्ज घेतले. मात्र मागील काही वर्षांमध्ये सततची नापिकी, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती तसेच शेतमालाला हमीभाव न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

परिणामी अनेक शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असून त्यांच्या कर्जाची थकबाकी १ ते २ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेत या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ देण्याची तरतूद असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, एखाद्या शेतकऱ्याची २ लाख रुपयांची थकबाकी असल्यास त्याला प्रथम स्वतःच्या खिशातून दीड लाख रुपये भरावे लागणार आहेत आणि त्यानंतरच ५० हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत एवढी मोठी रक्कम भरण्याची क्षमता बहुतांश शेतकऱ्यांकडे नसल्याने हजारो नव्हे तर लाखो शेतकरी प्रत्यक्षात या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत इतर पात्र शेतकऱ्यांप्रमाणेच २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक बालाजी सोसे, लोकजागर परिवारचे विश्वस्त प्रवीण गीते, प्राचार्य डी. आर. चव्हाण, गुलाबराव राठोड, कैलास भुमकर, राजू देशमुख, विष्णू घुगे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी राज्य शासनाला इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागणीची तात्काळ दखल घेऊन शासन निर्णयात आवश्यक सुधारणा कराव्यात. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता राज्य शासनाच्या कर्जमाफीविषयक निर्णयाची जाहीर होळी करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या परिस्थितीस सर्वस्वी राज्य शासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी कर्जबाजारीपणातून मुक्त व्हावेत, त्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!