तहसीलदार लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके अटकेत; अवैध वाळू उत्खनन व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये कारवाई

तहसीलदार लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके अटकेत; अवैध वाळू उत्खनन व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये कारवाई















जालना | वृत्तसेवा
अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी तसेच इतर गुन्ह्यांप्रकरणी कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग सोळुंके याच्याविरुद्ध २०२५ मध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाळू चोरीसंदर्भात अनेक गुन्हे दाखल झाले होते. गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१७/२०२५, २१८/२०२५ आणि २३०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. या प्रकरणांमध्ये त्याला अटक करण्यात आली होती व नंतर जामीनावर सुटका झाली होती.
दरम्यान, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केल्याच्या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणात तक्रारदार म्हणून सुयोग सोळुंके याचे नाव समोर आले होते. अवैध वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री व वाहनांवरील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एसीबीने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना अटक केली होती.
सुयोग सोळुंके याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. आता अवैध वाळू उत्खनन आणि चोरीच्या प्रकरणांमध्ये त्याच्याविरुद्ध पुन्हा कारवाई करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गोंदी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, तहसीलदारावरील लाचखोरीची कारवाई आणि त्यानंतर तक्रारदारावरील गुन्ह्यांमुळे या प्रकरणाची जिल्ह्यात व्यापक चर्चा सुरू असून विविध स्तरांवरून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!