लाइव्ह कॉन्सर्टमध्ये 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; आयोजकांच्या चौकशीला वेग
लाइव्ह कॉन्सर्टमध्ये 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू;
आयोजकांच्या चौकशीला वेग
मुंबई/वृत्तसेवा
मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून कार्यक्रमाच्या आयोजकांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टमध्ये वृषभ गांगुर्डे (वय 28) हा तरुण सहभागी झाला होता. कार्यक्रम सुरू असताना त्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेद्वारे त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमादरम्यान प्रज्ञा रे (वय 31) या महिलेचीही प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तिला उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
ताडदेव पोलिस ठाण्यात एडीआर क्रमांक 17/2026 अन्वये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने कार्यक्रमादरम्यान मद्य आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मृत वृषभ गांगुर्डे हा कायद्याचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली असून त्याने पश्चिम बंगालमधून विधी शिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या कॉन्सर्टचे आयोजन स्पेसबाउंड कंपनीकडून करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रत्येकी सुमारे चार हजार रुपयांची तिकीटे विकण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू केली आहे. तसेच आयोजक कंपनीतील संबंधित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशीही केली जात आहे. कार्यक्रमादरम्यान आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या का, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेशी यंत्रणा होती का आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणती त्रुटी होती का, याचाही तपास केला जात आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी पोलिसांकडून कायदेशीर चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील मोठ्या प्रमाणावर आयोजित होणाऱ्या कॉन्सर्ट आणि मनोरंजन कार्यक्रमांमधील सुरक्षा मानके, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृषभ गांगुर्डे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

टिप्पण्या