सुपारी, विश्वासघात आणि रक्तरंजित कट! शासकीय अभियंत्याची हत्या उघडकीस; पत्नी आणि मेहुणा अटकेत
सुपारी, विश्वासघात आणि रक्तरंजित कट!
शासकीय अभियंत्याची हत्या उघडकीस; पत्नी आणि मेहुणा अटकेत
सातारा/वृत्तसेवा
कराड शहरात घडलेल्या एका शासकीय अभियंत्याच्या मृत्यूचे गूढ उकलताना पोलिसांसमोर असे सत्य आले की, संपूर्ण जिल्हाच हादरून गेला. सुरुवातीला हा एक भीषण रस्ते अपघात असल्याचे वाटत होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपासातून हा अपघात नसून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचलेला खून असल्याचे उघड झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय 45) हे सुट्टीसाठी आपल्या कराड येथील घरी येत होते. शनिवारी ते कराडमध्ये पोहोचल्यानंतर घराकडे जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना कल्पनाही नव्हती की, त्यांच्या प्रत्येक हालचालींवर काहीजण नजर ठेवून आहेत आणि त्यांच्या मृत्यूचा कट आधीच रचला गेला आहे.
कराडमध्ये उतरून घराकडे जात असताना एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मंडले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हा एक अपघात असल्याचे मानले जात होते. परंतु पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांच्या हाती धक्कादायक दृश्ये लागली. कारने धडक दिल्यानंतर चालकाने वाहन थांबवले आणि पुन्हा मागे घेत मंडले यांच्या अंगावर वारंवार गाडी चालवल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून असल्याचे स्पष्ट झाले.
तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आणि एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत अभियंत्यांची पत्नी सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांच्यावर संशयाची सुई फिरली. चौकशीत या दोघांनी काही दिवसांपूर्वीच हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासात असेही समोर आले की, लक्ष्मण मंडले यांनी कराडमध्ये पोहोचल्यानंतर पत्नीला फोन करून आपल्याला घेण्यासाठी येण्यास सांगितले होते. याच फोनमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला आणि सुपारी घेऊन आलेल्या हल्लेखोरांना योग्य वेळी माहिती पुरविण्यात आली, असा पोलिसांचा संशय आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून पत्नी सुरेखा मंडले आणि मेहुणा संग्राम चव्हाण यांना अटक केली आहे. तर प्रत्यक्ष हल्ला करणारे दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
एका शासकीय अभियंत्याचा मृत्यू अपघातात झाला असे वाटत असतानाच त्यामागे सुपारी, विश्वासघात आणि कौटुंबिक कटकारस्थानाचा थरारक चेहरा समोर आल्याने सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येमागील नेमके कारण काय होते, सुपारी किती रुपयांत देण्यात आली होती आणि फरार आरोपींची भूमिका काय होती, याचा उलगडा पुढील तपासात होणार आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सातारा पोलिसांकडून सुरू आहे.

टिप्पण्या