शेतजमिनीचा मालकी हक्क व वाटणी यावरुन मुलानेच केली स्वतःच्या वडिलांसह लहान भावाची हत्या
शेतजमिनीचा मालकी हक्क व वाटणी यावरुन मुलानेच केली स्वतःच्या वडिलांसह लहान भावाची हत्या
जुन्नर जि. पुणे/वृत्तसेवा
शेतजमिनीचा मालकी हक्क व तिची वाटणी यावरुन मुलानेच वडिलांची व लहान भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील जुन्नरमध्ये कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले आहे. मुलानेच वडिलांची आणि लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
कौटुंबिक वादाचे रूपांतर या दुहेरी हत्याकांडात झाले आहे. या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका आणि ओतूर परिसरात खळबळ उडाली आहे. ओतूर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मुलाला अटक केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव मढ येथील बगाडवाडी भागात हे दुहेरी हत्याकांड घडले आहे. जयराम महादू मुकणे वय ६० वर्षे आणि राजेंद्र जयराम मुकणे वय २७ वर्षे अशी खून झालेल्या वडील व भावाची नावे आहेत. तर बाबाजी जयराम मुकणे वय ३२ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.
जमिनीचा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी बाबाजी मुकणे याने वडील जयराम आणि लहान भाऊ राजेंद्र यांच्या डोक्यावर दगडाने मारून खुन केला आहे. हा दगडाचा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकणे कुटुंबात गेल्या काही काळापासून कौटुंबिक कलह सुरू होता. शेतजमिनीची वाटणी आणि मालकी हक्कावरून वडील व आरोपी मुलामध्ये सतत भांडण होत असत. पैशांच्या देवाणघेवाणी वरुनही त्यांच्यात वारंवार भांडणे होत असे. तसेच वडील आपले ऐकत नाही याचा राग बाबाजीच्या मनात होता. याच पैशांच्या आणि जमिनीच्या वादातून मोठे हत्याकांड घडले आहे.
नेहमीप्रमाणे होणाऱ्या भांडणाचे रूपांतर खुनात झाले. रागाच्या भरात बाबाजी मुकणे याने डोक्यात दगड घालून वडील आणि भावाची हत्या केली आहे. वडिलांची आणि भावाची हत्या केल्यानंतर आरोपी बाबाजी मुकणे याने पुरावा नष्ट करण्याचा आणि गावातून फरार होण्याचा प्रयत्न केला. परंतु, घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपी बाबाजी मुकणे याला जेरबंद करीत अटक केली आहे.
ओतूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि/भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ते जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

टिप्पण्या