संत श्री गजानन महाराजांचा पंढरपूर पालखी सोहळा; २१ जून रविवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ होणार
संत श्री गजानन महाराजांचा पंढरपूर पालखी सोहळा
२१ जून रविवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ होणार
शेगाव/वृत्तसेवा :-
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याला दि. २१ जून रविवारपासून श्रीक्षेत्र शेगाव येथून मोठ्या भक्तिभावात प्रारंभ होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी, भाविक आणि सेवेकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, "गण गण गणात बोते" या जयघोषात पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा पालखी सोहळा विविध गावांमधून मार्गक्रमण करत आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. पालखीचा प्रवास बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यांतील अनेक गावांमधून होणार असून मार्गात भाविकांकडून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येणार आहे.
सोहळ्यादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पालखीच्या मुक्कामस्थळी वारकऱ्यांसाठी भोजन, निवास व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील गावांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी स्वागत कमानी, रांगोळ्या आणि पुष्पवृष्टीची तयारीही करण्यात येत आहे.
यावर्षीचा पालखी सोहळा २१ जून २०२६ रोजी शेगाव येथून प्रारंभ होऊन विविध टप्प्यांतून प्रवास करत २३ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने हजारो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून श्री गजानन महाराजांची पालखी ही वारी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीपरंपरेने हा पालखी सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे.
"गण गण गणात बोते"च्या अखंड नामस्मरणाने संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
🙏॥ गण गण गणात बोते ॥🙏

टिप्पण्या