मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून अत्याचार; जळगावातील ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड, संशयितांच्या मालमत्तांवर बुलडोझर कारवाई
मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून अत्याचार;
जळगावातील ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड,
संशयितांच्या मालमत्तांवर बुलडोझर कारवाई
जळगाव/वृत्तसेवा
जळगाव शहरात एका अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणाच्या तपासादरम्यान शहरातील मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिस आणि प्रशासनाने संबंधित संशयितांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा उलगडा होत गेला आणि शहरात कार्यरत असलेल्या मोठ्या ड्रग्ज नेटवर्कची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि औद्योगिक वसाहत पोलिसांनी संयुक्तरीत्या तपासाची व्याप्ती वाढवली.
दरम्यान, या गुन्ह्याशी संबंधित संशयित आरोपींच्या मालमत्तांची चौकशी करण्यात आली. जळगाव औद्योगिक वसाहत पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटशी संबंधित सहा संशयितांच्या मालमत्तांची माहिती गोळा करून त्या कायदेशीर आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणांची पाहणी केल्यानंतर काही बांधकामे अनधिकृत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. त्यानुसार सोमवारी रात्री जळगाव महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुप्रीम कॉलनी परिसरात कारवाई केली. महापौर दीपमाला काळे, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारवाईदरम्यान संशयित आरोपींच्या घरासमोर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली दोन दुकाने जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. या कारवाईवेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
तपासादरम्यान निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांची चौकशी करण्यात आली. चौकशीतून अमली पदार्थांच्या पुरवठा आणि वितरण साखळीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शहरात कार्यरत असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे याच तपासातून उघड झाले आहेत.
यापूर्वी ३ जून २०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचून लकी पाटील, रईस हारून देशमुख, तौसिफ आसिफ सय्यद आणि कुणाल पाटील यांना अटक केली होती. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर संपूर्ण रॅकेटची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. तसेच ड्रग्ज रॅकेटशी संबंधित इतर संशयितांच्या मालमत्तांचीही चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणे आढळल्यास संबंधितांना नोटिसा बजावून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि अमली पदार्थांच्या जाळ्याशी संबंधित या गंभीर प्रकरणामुळे जळगाव प्रशासन सतर्क झाले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आरोपींविरोधात पुरावे संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टिप्पण्या