सिंदखेडराजा तालुक्यात मान्सूनपूर्व सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; सरकार व विमा कंपन्यांनी तातडीने सर्व्हे करावा

सिंदखेडराजा तालुक्यात मान्सूनपूर्व सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर

शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, 

सरकार व विमा कंपन्यांनी तातडीने सर्व्हे करावा









सिंदखेडराजा:- तालुक्यात काल दि. १२ जून, शुक्रवारी सायंकाळ पासून तर रात्री उशीरापर्यंत अचानक आलेल्या प्रचंड वेगवान सोसाट्याच्या वाऱ्याने शेती, घरं, गोठे आणि वाहनांसह गावशिवारांमध्ये विविध प्रकारचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले आहे. मान्सूनपूर्व कालावधीत असे वादळी वारे नेहमीच शेतकऱ्यांसाठी संकट ठरतात, यंदाही त्याचा फटका सिंदखेडराजा ते साखरखेर्डा पर्यंतच्या परिसराला बसला आहे.

लिंगा-सायाळा ते लिंगा-देवखेड यासह सिंदखेडराजा तालुक्यातील परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या वृक्षांच्या फांद्या तुटल्या, काही ठिकाणी पूर्ण वृक्ष उन्मळून पडले. यामुळे घरांवरची आणि गोठ्यांवरची पत्रे उडून गेली, नेटशेड फाटले आणि उडाले. झाडांना असलेले आंबे व बागांमधील लागलेली फळे झडून पडली आहेत. गावशिवारांत उभ्या चारचाकी गाड्या, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांवर तुटलेल्या फांद्या व उन्मळलेले वृक्ष पडल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.

माहेरखेड येथील नुकसानग्रस्त शेतकरी रवी जायभाये, किसन नागरे, निखिल देवरे, गजानन डिघोळे, सोहम जायभाये, गजानन जायभाये, आकाश डोईफोडे यांच्यासह लिंगा-सायाळा येथील उद्धव राजेश्वर चेके यांच्या सोलार पंपाच्या प्लेट्स आणि संचलन यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. या सोलार पंपांचे नुकसान शेतीसाठी दीर्घकालीन अडचण निर्माण करणारे ठरेल.

बाळसमुद्र येथील पंढरी उत्तमराव मेरत यांच्या शेतातील गोठ्याची पत्रे उडून, लोखंडी अँगल तुटून संपूर्ण गोठाच नेस्तनाबूत झाला आहे.

मलकापूर पांग्रा शिवारातील शेतातील झाडे व शेतातील सोलर पंपाच्या प्लेट तसेच विजेचे खांब कोलमडून पडले शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गजानन उत्तमराव आटोळे शेतातील सोलर पंपाच्या प्लेट उखडून, कोलमडून पडल्या आहेत. राजबंडू उत्तमराव आटोळे यांच्या शेतातील विजेचे खांब व झाडे पडली आहेत.

सौ नंदा गोविंद आटोळे, दिलीप उत्तमराव आटोळे यांच्या शेतातील आंबा व रामफळाची झाडे उन्मळून पडली आहेत. रामेश्वर गबाजी आटोळे, आसाराम जयाची दानवे, महादू  विठोबा गावंडे, गजानन भाऊराव देशमुख, रामेश्वर आसाराम दानवे, समाधान मच्छिंद्र साळवे, शिवाजी दगडोबा शिरसाट आदि अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

रात्रीच्या अंधारात आलेल्या या सोसाट्यामुळे गावागावांत आणि शिवारात नुकसान झाले. सकाळी शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली आणि संपूर्ण दिवस नुकसानीची आवरसावर करण्यात घालवला. अनेक गावांतील पूर्ण माहिती अद्यापही उपलब्ध नसल्याने, गावागावातील नुकसान लाखोंच्या घरात व त्यातून तालुक्यातील एकूण नुकसान करोडोंच्या वर असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व काळात (मे-जून) वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस ही नेहमीची समस्या आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामात मदतीला येणारी अवजारे, उपकरणे इत्यादि साधनसामुग्री तसेच रब्बी हंगामातील उशीरापर्यंतची पिके तसेच आंबा सारखी फळे आदिंना  मोठा फटका बसतो. यंदाही राज्याच्या विविध भागांत (धाराशिव, जळगाव, नाशिक इ.) अशा घटना घडल्या आहेत. सिंदखेडराजा तालुका हा कृषिप्रधान भाग आहे; येथे खरीपाची सोयाबीन, कापूस, रब्बीची गहू, हरभरा यांसह इतरही अनेक पिके घेतली जातात. वृक्ष उन्मळणे आणि फळझाडांचे नुकसान यामुळे केवळ चालू हंगामातील उत्पन्नच नाही तर दीर्घकालीन उत्पादन क्षमतेवरही परिणाम होतो.

शेतकऱ्यांच्या घरगुती आणि शेती उपकरणांचे नुकसान, सोलार पंपांसारख्या आधुनिक साधनांचे नुकसान आणि पिकांचे नुकसान मिळून लाखों रुपयांचा तोटा झाला आहे. रात्रीचा वेळ आणि अचानकपणा यामुळे मानवी हानी टळली हे सुदैव, पण आर्थिक संकट मात्र गडद आहे.

या नुकसानीबाबत बुलढाणा जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्या (PMFBY अंतर्गत) यांनी तातडीने पाहणी करून नुकसान भरपाई प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सर्व्हे टीम तातडीने गावागावांत पाठवावी. घर, गोठा, सोलार पंप, वाहने आणि पिकांच्या नुकसानीचा समावेश करून भरपाई द्यावी. विमा कंपन्यांनी क्लेम प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी. आवश्यक असल्यास राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, ह्या प्रमुख मागण्या व्यक्त केल्या जात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!