हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; १५ जूनला सिंदखेडराजात भव्य मोर्चा; प्रसंगी मंत्रालय गाठण्याचाही निर्धार
हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार;
१५ जूनला सिंदखेडराजात भव्य मोर्चा;
प्रसंगी मंत्रालय गाठण्याचाही निर्धार
सिंदखेडराजा/प्रतिनिधी
सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील अनेक शेतकरी अद्याप त्यांच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. नुकसान होऊनही शासनाकडून पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १५ जून रोजी सिंदखेडराजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तर न्याय न मिळाल्यास प्रसंगी मुंबई येथे मंत्रालय गाठून मोर्चा व आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता पंचायत समिती, सिंदखेडराजा येथून होणार असून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. पीक विमा प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
समितीच्या बैठकीत प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः उपस्थित राहून पीक विम्याच्या पावतीची झेरॉक्स प्रत, संबंधित कागदपत्रे आणि स्वतंत्र निवेदन सोबत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सर्व निवेदने प्रशासनाकडे सादर करून शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत.
शेतकरी योद्धा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने नुकसान मान्य केले असतानाही अनेक पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा उभारण्यात आला आहे. मोर्चामध्ये जमा होणाऱ्या प्रत्येक अर्जाचा पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी समितीच्या वतीने इशाराही देण्यात आला की, स्थानिक स्तरावर प्रश्न न सुटल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून मंत्रालय, मुंबई येथेही मोर्चा व आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मोर्चाबाबतची पूर्वकल्पना व माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच सिंदखेडराजा पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
"आज आपल्या हक्कासाठी आपणच उभे राहिलो नाही तर भविष्यात आपल्या मुलांना उत्तर देता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने या लढ्यात सहभागी व्हावे," असे आवाहन शेतकरी योद्धा कृती समितीने केले आहे.
पीक विम्याच्या प्रश्नावर गेल्या अनेक महिन्यांपासून असंतोष व्यक्त होत असून, १५ जून रोजी होणाऱ्या या मोर्चाकडे परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

टिप्पण्या