ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का; टीएमसीच्या बँक खात्यांवर निर्बंध, निधीच्या व्यवहारांवरून वाद तीव्र
ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का;
टीएमसीच्या बँक खात्यांवर निर्बंध,
निधीच्या व्यवहारांवरून वाद तीव्र
कोलकाता/वृत्तसेवा
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाच्या बँक खात्यांबाबत वाद निर्माण झाला असून पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे माजी खजिनदार अरूप बिस्वास यांनी पक्षाच्या बँक खात्यांमधील व्यवहारांवर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या असून संबंधित खात्यांवरील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, अरूप बिस्वास यांनी कोलकात्यातील एचडीएफसी बँकेच्या सेंट्रल प्लाझा शाखेला पत्र पाठवून टीएमसीच्या खात्यांमधील कोणतेही पैसे काढणे, हस्तांतरण किंवा इतर आर्थिक व्यवहार तात्पुरते थांबवण्याची मागणी केली होती. पक्षाच्या नेतृत्व आणि आर्थिक नियंत्रणावर गंभीर वाद सुरू असल्याने खात्यांतील निधी सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, पक्षातील बंडखोर आमदारांच्या गटानेही बिधाननगर पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार दाखल करून पक्षाच्या निधीची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून तीन बँक खात्यांमधील व्यवहारांची माहिती मागवण्यात आली आहे. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर निधीची उलाढाल झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील काही कलमांखाली गुन्हा नोंदवून निधीचा स्रोत, व्यवहारांचे स्वरूप आणि आर्थिक हालचालींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या नावावर असलेल्या तीन खात्यांमधील व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी मात्र या कारवाईवर आक्षेप घेतला असून पक्षाचे अधिकृत खजिनदार सुभाशीष चक्रवर्ती असल्याचा दावा केला आहे. अरूप बिस्वास यांना खजिनदार म्हणून अधिकार नसल्याने त्यांच्या पत्राला कायदेशीर वैधता नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पक्ष या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असून सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अरूप बिस्वास यांनी मात्र पक्षाच्या नेतृत्वाबाबतच अनिश्चितता निर्माण झाल्याचा दावा केला आहे. पक्षाचे खरे नेतृत्व आणि आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण कोणाचे याबाबत वाद सुरू असल्याने बँकेने ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, अशी त्यांची भूमिका आहे. वाद निकाली निघेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला खात्यांमधून निधी काढण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या आर्थिक अहवालानुसार, तृणमूल काँग्रेसकडे हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये बँक ठेवी, विविध गुंतवणुका आणि इतर आर्थिक मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे या खात्यांवरील निर्बंध आणि निधीच्या चौकशीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षातील वाढता अंतर्गत संघर्ष, आमदार-खासदारांमधील मतभेद आणि आर्थिक व्यवहारांवरील प्रश्न यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टिप्पण्या