तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करा; ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी; माढा येथे दुग्धाभिषेक आंदोलन; कारखानदारांवर वचक निर्माण होण्याची आशा
तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी; माढा येथे दुग्धाभिषेक आंदोलन
कारखानदारांवर वचक निर्माण होण्याची आशा
पंढरपूर/वृत्तसेवा
सध्या राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरु आहे. ह्या धडक कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या देशभरात चांगल्याच चर्चेत आहे. भेसळखोरांविरोधात कोणतीही तडजोड न करता सुरु असलेल्या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुंढे यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. दरम्यान मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती केल्यास कारखानदारांवर वचक निर्माण होईल, असा दावा शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. प्रशासनातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनहिताच्या भूमिकेचे प्रतीक म्हणून हा दुग्धाभिषेक करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
भेसळखोरांविरोधात कोणतीही तडजोड न करता सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुंढे यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आंदोलकांनी साखर उद्योगातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ऊसाची देयके थकवली आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची साखर आयुक्तपदी नियुक्ती केल्यास थकीत रक्कम वसुलीला गती मिळेल व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त यावेळी व्यक्त करण्यात आला.
शासनाने शेतकरी हिताचा विचार करून मुंढे यांना साखर आयुक्त नियुक्त करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. सध्याचे साखर आयुक्त केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती केल्यास थकीत रकमेच्या वसुलीला गती मिळेल, साखर उद्योगातील गैरप्रकारांवर नियंत्रण राहील, कारखानदारांवर वचक निर्माण होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला. राज्यभर फसव्या जाहिरातींसह केमिकलचा वापर, भेसळयुक्त खवा, तूप, बनावट औषधं आणि अवैध गुटख्याचा साठा जप्त करत त्यांनी अनेक दुकानं सील केली, त्यामुळं तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आहेत.

टिप्पण्या