पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा तीव्र एल्गार; आता पुढील लढाई कोर्टातच!

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा तीव्र एल्गार; 

आता पुढील लढाई कोर्टातच!



सिंदखेडराजा, दि. १५ जून :

खरीप २०२५ मधील अतिवृष्टीने बळी ठरलेल्या शेतकऱ्यांना न्याय्य पीक विमा मिळावा यासाठी आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या नेतृत्वाखाली सिंदखेडराज्यात भव्य आणि तीव्र मोर्चा निघाला. शेकडो संतप्त शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते एकवटले होते.

मोर्चादरम्यान प्रशासनाकडे सामूहिक निवेदन देण्यात आले. शेकडो शेतकऱ्यांनी वैयक्तिक अर्ज सादर केले. मात्र, चर्चेदरम्यान सोयाबीन पिकाला पीक विमा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे स्पष्ट झाल्यावर शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला.

अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस, ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद, शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टी मदत, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी, पंचनामे आणि प्रत्यक्ष पाहणी — सर्व पुरावे शेतकऱ्यांच्या बाजूने असतानाही विमा कंपन्यांनी विमा नाकारल्याने शेतकरी संतापले आहेत.

शेतकऱ्यांनी स्पष्ट संदेश दिला की, “आता प्रशासन आणि विमा कंपन्यांच्या दारात फिरण्यात काही अर्थ उरलेला नाही. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत.”

पुढील १० ते १२ दिवसांत सर्व आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि दस्तऐवज गोळा करून पीक विमा कंपनीविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. 

“न्याय आमच्या बाजूने आहे आणि ही लढाई शेतकरी जिंकणारच,” असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

या वेळी बोलताना लोकजागर परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण गीते, शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष गजानन जायभाये, बंजारा सेवा संघाचे दत्तू चव्हाण, रा. का. चे कार्याध्यक्ष विनायक भानुसे पाटील, बळीवंशचे नितीन कायंदे, उबाठाचे सिद्धेश्वर आंधळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन दराडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि लढ्याचा निर्धार व्यक्त केला.

शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा, बालाजी सोसे यांनी सर्व सहभागी शेतकरी, कार्यकर्ते आणि संघटनांचे आभार मानत, पुढील लढ्यातही पूर्ण एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.

शेतकरी आता केवळ मागणी करणार नाहीत, तर लढाई लढणार आहेत!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!