वाळू माफियाशी आर्थिक संगनमत? अंबडच्या तहसिलदाराला ६.४० लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
वाळू माफियाशी आर्थिक संगनमत?
अंबडच्या तहसिलदाराला ६.४० लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
जालना/वृत्तसेवा
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. अवैध वाळू वाहतूक आणि पोकलेन मशीनवर कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात लाखोंची लाच मागणाऱ्या अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे पोकलेन मशीन तसेच सहा हायवा ट्रक असून त्यांच्यामार्फत वाळूची वाहतूक सुरू होती. या वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तहसिलदार विजय चव्हाण यांनी दरमहा तब्बल सात लाख रुपयांची लाच मागितली होती. महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम मागितल्याने तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने अंबड येथे सापळा रचला. चर्चेनंतर लाचेची रक्कम ७ लाखांवरून ६ लाख ४० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. शनिवारी ठरल्याप्रमाणे ही रक्कम स्वीकारताना तहसिलदार विजय चव्हाण यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईनंतर महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी असलेले कथित आर्थिक संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चांना या घटनेमुळे अधिक बळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, विजय चव्हाण हे यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. २०२४ मध्ये अब्दीमंडी येथील सुमारे २५० एकर निर्वासित जमिनीच्या फेरफार आणि विक्री प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या प्रकरणी शासनाने त्यांना निलंबितही केले होते. निर्वासित संपत्तीच्या नोंदी आणि फेरफार प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
आता पुन्हा एकदा लाखोंच्या लाच प्रकरणात अटक झाल्याने महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि इतर अधिकारीही एसीबीच्या रडारवर येतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या