भाजप प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम!; "तुतारी कायम हातातच! डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या अफवा"; "मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ जिल्हा बँक व सहकारी संस्थांच्या कामांसाठीच" – डॉ. राजेंद्र शिंगणे

भाजप प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम!

"तुतारी कायम हातातच! डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या अफवा"

"मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ जिल्हा बँक व सहकारी संस्थांच्या कामांसाठीच" – डॉ. राजेंद्र शिंगणे



बुलढाणा | प्रतिनिधी

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवांना स्वतः डॉ. शिंगणे यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडियावर सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, या सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर "डॉ. शिंगणे कमळ हाती घेणार", "मुख्यमंत्र्यांशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा", "भाजपमध्ये जाणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह" अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पैनगंगा सहकारी सूतगिरणी आणि देऊळगावराजा येथील सोयाबीन प्रकल्पाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याने या चर्चांना अधिक उधाण आले.

मात्र, याबाबत स्पष्टीकरण देताना डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले की, "आपण दोन दिवसांपासून मुंबईत असून जिल्हा सहकारी बँकेसंदर्भातील दोन महत्त्वाच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे अद्याप भेट होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली म्हणजे आपण भाजपमध्ये जात आहोत असा अर्थ होत नाही. पक्षांतराचा कोणताही निर्णय झालेला नाही."

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हा प्रवक्ते अमोल भट यांनीही अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे उत्पादन नूतनीकरण आणि जिल्हा बँकेतील शासकीय व्यवहारांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट निश्चित करण्यात आली होती. या भेटीचा आणि कथित पक्षबदलाचा कोणताही संबंध नाही.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांमुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, डॉ. शिंगणे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि पक्षाच्या अधिकृत स्पष्टीकरणामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सध्या तरी पडदा पडला आहे.


राजकारणात अफवा आणि चर्चांना नेहमीच उधाण येत असते. मात्र, "आपण तुतारीसोबतच आहोत आणि पक्षांतराचा कोणताही निर्णय घेतलेला नाही," हा संदेश डॉ. शिंगणे यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्टपणे समोर आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला