तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा गैरफायदा; बनावट एफडीए अधिकारी बनून खंडणी उकळणाऱ्या टोळीवर गुन्हा
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा गैरफायदा;
बनावट एफडीए अधिकारी बनून खंडणी उकळणाऱ्या टोळीवर गुन्हा
नाशिक/वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तडफदार अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे व निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कठोर मोहिमेमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असताना, त्याच कारवाईचा गैरफायदा घेत काही भामटे स्वतःला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी म्हणून भासवत व्यावसायिकांकडून खंडणी उकळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
नाशिक शहरातील अशाच एका बनावट टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, महिलेसह तीन जणांविरुद्ध फसवणूक व खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बेकरी व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आले. आरोपींनी स्वतःला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवून हजारो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी कारगिल चौक परिसरातील एका बेकरीत जाऊन आरोपींनी अन्न व औषध प्रशासनाची बनावट ओळखपत्रे दाखवली. दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो व व्हिडिओ काढल्यानंतर परवाना रद्द करण्याची व दुकान बंद करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीपोटी संबंधित व्यावसायिकाकडून १५ हजार रुपये रोख व ३ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच दिवशी द्वारका परिसरातील आणखी एका बेकरी व्यावसायिकालाही आरोपींनी लक्ष्य केले. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळल्याचा बनाव करून कारवाईची धमकी देत त्याच्याकडूनही १५ हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बेकारी व्यावसायिक रिजवान इब्राहिम खान यांच्या तक्रारीवरून रोशन चांगदेव गव्हाणे, विजय चुनीलाल बागूल आणि राजनंदिनी संतोष अहिरे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींपैकी दोघे जण स्थानिक खासगी माध्यमाशी संबंधित कॅमेरामन व प्रतिनिधी असल्याची, तर महिला आरोपी एका संस्थेची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींची अधिकृत ओळखपत्रे, आदेशपत्रे व नियुक्तीची खातरजमा केल्यानंतरच सहकार्य करावे. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिस किंवा संबंधित शासकीय विभागाशी संपर्क साधावा.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, त्याचा गैरफायदा घेऊन बनावट अधिकारी बनणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

टिप्पण्या