सीलबंद बंगल्यातील मध्यरात्रीची घुसखोरी; लाचखोर अधिकाऱ्याचे पुरावे गायब करण्याचा कट?

सीलबंद बंगल्यातील मध्यरात्रीची घुसखोरी; 

लाचखोर अधिकाऱ्याचे पुरावे गायब करण्याचा कट?



जळगाव/वृत्तसेवा

लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सीलबंद घरात मध्यरात्री झालेली रहस्यमय घुसखोरी आणि त्यानंतर झालेल्या दोन जणांच्या अटकेमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. हा केवळ घरफोडीचा प्रयत्न होता की भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला कट होता, याचा शोध आता पोलीस आणि तपास यंत्रणा घेत आहेत.

जळगावचे जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्यावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांचे गणेश कॉलनीतील निवासस्थान सील करण्यात आले होते. मात्र, सीलबंद घराच्या शांततेला मध्यरात्री अचानक तडा गेला.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्तींनी घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून शिडीच्या साहाय्याने घरात प्रवेश केला. सीलबंद घरातून येणारे आवाज ऐकून सतर्क झालेल्या शेजाऱ्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घराच्या आतून प्रसाद नारखेडे व प्रवीण महाजन या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत या दोघांचे किरण चौधरी यांच्याशी नातेवाईकांचे संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या घुसखोरीमागील संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक संशयानुसार, सीलबंद घरात प्रवेश करण्यामागचा उद्देश चोरी नसून महत्त्वाचे दस्तऐवज, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, हिशोबाच्या डायऱ्या किंवा इतर संवेदनशील कागदपत्रे हटविण्याचा असू शकतो. एसीबीच्या पुढील कारवाईपूर्वी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला की काय ? हा आता तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

याशिवाय घरात मोठी रोख रक्कम, मौल्यवान दागिने किंवा इतर मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा डाव रचला गेला होता का, याचाही तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना नेमके कोणाचे निर्देश होते, त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर काय शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मोबाईलमधून कोणते धागेदोरे मिळतात, याकडे तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून सुरू झालेली ही चौकशी आता पुरावे नष्ट करण्याच्या संभाव्य कटापर्यंत पोहोचली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगावातील या घटनाक्रमाने प्रशासकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!