मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात? भिवंडीतील ॲमेझॉन गोदामावर एफडीएची मोठी कारवाई; परवाना निलंबित, दोघांवर गुन्हा दाखल

मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात? 

भिवंडीतील ॲमेझॉन गोदामावर एफडीएची मोठी कारवाई; 

परवाना निलंबित, दोघांवर गुन्हा दाखल


मुंबई/वृत्तसेवा 

राज्यात अन्न भेसळ, गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडीतील ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामावर मोठी कारवाई केली आहे. मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठविल्याचा संशय व्यक्त करत एफडीएने सुमारे दीड टन कालबाह्य आणि खराब झालेला खाद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफडीएला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील सरवली परिसरातील गोदामातून मुदत संपलेले खाद्यपदार्थ नियमानुसार नष्ट न करता पुन्हा विक्रीसाठी पाठविले जात असल्याचा संशय होता. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २४ जून, बुधवारी मध्यरात्री छापा टाकून तपासणी केली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य, खराब झालेला आणि मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकणारा खाद्यसाठा आढळून आला. त्यानंतर हा साठा जप्त करण्यात आला.

एफडीएच्या प्राथमिक चौकशीत आर. के. ट्रेडर्सचे मालक रहमान के. यांनी करारातील अटींचे उल्लंघन करून मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याऐवजी त्यांची बाजारात पुनर्विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित माल नष्ट केल्याचे कथित खोटे प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात आर. के. ट्रेडर्सचे मालक रहमान के. आणि ॲमेझॉन रिटेल इंडियाचे पश्चिम विभागाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर यांच्याविरुद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध तरतुदींनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुदतबाह्य अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तपासादरम्यान मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीशी संबंधित कागदपत्रे, वाहतूक नोंदी आणि प्रमाणपत्रांचीही पडताळणी केली जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अन्न सुरक्षा मोहिम राबविली जात आहे. पुणे दारू दुर्घटनेनंतर मेथेनॉल साठ्यांवर कारवाई, भेसळयुक्त अन्नपदार्थांवरील धाडी, तसेच गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधातील मोहीम यामुळे एफडीएची कारवाई अधिक तीव्र झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत ॲमेझॉन कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आलेली नसून पोलीस आणि एफडीएचा तपास सुरू आहे. अंतिम जबाबदारी व दोष निश्चित होणे हे तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!