सिंदखेडराजा तालुक्यात मान्सूनपूर्व सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर; शेतकऱ्यांच्या नुकसानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली
सिंदखेडराजा तालुक्यात मान्सूनपूर्व सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर;
शेतकऱ्यांच्या नुकसानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली
यंत्रणेतील वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज
सिंदखेडराजा:-
तालुक्यात १२ जून रोजी शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या प्रचंड वेगवान सोसाट्याच्या वाऱ्याने शेती, घरं, गोठे, वाहने आणि विविध शेती उपकरणांसह गावशिवारात व्यापक नुकसान केले आहे. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढले असून, मान्सूनपूर्व काळातील अशा घटना यंदाही कृषिप्रधान सिंदखेडराजा तालुक्यासाठी मोठे संकट ठरल्या आहेत. जसजशी माहिती प्राप्त होत आहे, तसतशी नुकसानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सर्व्हे सुरु आहेत, मात्र अनेक ठिकाणी सर्व्हेचा पत्ताच नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेतील वरिष्ठांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
नुकसानीची व्याप्ती
वादळी वाऱ्याने सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश परिसरात अनेक भागांत मोठ्या वृक्षांच्या फांद्या तुटल्या आणि काही ठिकाणी पूर्ण झाडे उन्मळून पडली. यामुळे शेतकऱ्यांच्या घरांवरची आणि गोठ्यांवरची पत्रे (टिन शीट्स) उडून गेली, सोलार पंपाच्या प्लेट्ससह त्याच्या नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणेचे तीनतेरा वाजलेत, नेटशेड फाटून उडून गेले. आंब्याच्या झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात झडून पडली. गावशिवारांत उभ्या चारचाकी वाहनांवर, ट्रॅक्टरांवर आणि इतर शेतीउपकरणांवर तुटलेल्या फांद्या व झाडे पडल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक प्रभावित गावे आणि परिसर:
सावखेड तेजन, हनवतखेड, वाघोरा, पिंपरखेड, आडगाव राजा
सोनोशी, वर्दडी, बुट्टा, चांगेफळ, रुम्हणा, देवखेड
लिंगा, पिंपळगाव कुडा, जऊळका, सोयंदेव, जांभोरा
राहेरी, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, झोटिंगा ते साखरखेर्डा
सावखेड तेजन येथील यमुनाबाई ज्ञानदेव जायभाये यांच्या शेतातील सोलार पंपाच्या प्लेट्स आणि नियंत्रण यंत्रणेला मोठी क्षती पोहोचली आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
सिंदखेडराजा तालुका हा मुख्यतः कृषिप्रधान भाग आहे. येथे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा यासारखी महत्त्वाची पिके घेतली जातात. वादळी वाऱ्यामुळे केवळ चालू हंगामातील पिके आणि आंबा फळबागांचेच नव्हे तर दीर्घकालीन उत्पादन क्षमतेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. घरगुती इमारती, शेती उपकरणे, सोलार पंप आणि वाहनांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात मे-जून महिन्यात मान्सूनपूर्व काळात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस ही नेहमीची समस्या आहे. यंदाही धाराशिव, जळगाव, नाशिकसह विविध जिल्ह्यांत अशा घटना घडल्या आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे आधीच वैतागलेला असताना या वादळाने त्यांना आणखी हतबल केले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्यांकडे (PMFBY अंतर्गत) तातडीने पाहणी करण्याची आणि नुकसान भरपाई प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.
मुख्य मागण्या:
सर्व्हे टीम तातडीने गावागावांत पाठवावी.
घर, गोठा, सोलार पंप, वाहने, शेतीउपकरणे आणि पिकांच्या नुकसानीचा समावेश करून भरपाई द्यावी.
विमा कंपन्यांनी क्लेम प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी.
आवश्यक असल्यास राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज जाहीर करावे.
सध्या काही गावशिवारांत महसूल, कृषी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून सर्व्हेला सुरुवात झाली असली तरी अनेक भागांत अजूनही कोणतीही हालचाल दिसून येत नाही. रात्रीच्या वेळी आणि अचानक आलेल्या वादळामुळे मानवी हानी टळली ही एकमेव दिलासादायक बाब आहे.
बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांनी या संकटाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.

टिप्पण्या