सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक; तहसील कार्यालयावर आंदोलन
सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक;
तहसील कार्यालयावर आंदोलन
सिंदखेडराजा/वृत्तसेवा :
शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व शर्तींशिवाय सरसकट कर्जमुक्ती द्यावी तसेच सन २०२५-२६ चा पीक विमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवार, दि. २२ जून रोजी सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असून त्यातील अटी व निकष अत्यंत जाचक असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ही कर्जमाफी नसून कर्जवसुलीची योजना असल्याची भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिली होती, त्याच धर्तीवर सध्याच्या सरकारनेही कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, असेही आंदोलकांनी म्हटले.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बद्री बोडखे, तालुका प्रमुख आत्माराम शेळके, युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर आंधळे, तालुका संघटक म्हसाजी वाघ, रणजीत मरमट, शिवाजीराव देशमुख, उल्हास भुसारे, बालाजी सोसे, विभाग प्रमुख योगेश चतुर, शिवा पुरंदरे, अविनाश मोगल, भागवत मुरकुट, प्रशांत जायभाये, गणेश गायकवाड, एकनाथ मिसाळ, उद्धव मांटे, श्रीराम जायभाये, रामेश्वर दराडे, दत्ता सानप यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या