ग्राहकांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लाउड किचनसाठी कडक नियम लागू

ग्राहकांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; 

हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लाउड किचनसाठी कडक नियम लागू

मुंबई/वृत्तसेवा : 

अन्नातील भेसळ, अस्वच्छ स्वयंपाकगृहे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त  यांनी राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कँटिन, क्लाउड किचन तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांसाठी कठोर अन्न सुरक्षा नियमावली लागू केली आहे. या नियमांचे पालन करणे सर्व संबंधित आस्थापनांना बंधनकारक असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

किचनमध्ये स्वच्छता अनिवार्य

नव्या नियमांनुसार स्वयंपाकघरातील भिंती व फरशा वॉटरप्रूफ आणि सहज धुता येतील अशा टाईल्सच्या असाव्यात. किचनमध्ये पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच झुरळे, उंदीर, पाली व इतर कीटकांपासून मुक्त वातावरण राखण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल व इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅपची व्यवस्था करावी लागणार आहे.

शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था

शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठवणूक व स्वयंपाक स्वतंत्रपणे करणे आवश्यक करण्यात आले आहे. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवून क्रॉस-कंटॅमिनेशन टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गरम अन्न ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त, थंड अन्न ४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि फ्रोजन अन्न उणे १८ अंश सेल्सिअस तापमानात साठवणे आवश्यक राहणार आहे.

वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरावर बंदी

एकदा तळण्यासाठी वापरलेले खाद्यतेल पुन्हा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तेलाचा रंग काळा पडल्यास किंवा त्यातून दुर्गंधी येत असल्यास ते तात्काळ नष्ट करावे लागणार आहे. याशिवाय वडापाव, भजी किंवा इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी फूड-ग्रेड पॅकेजिंगचा वापर करणे बंधनकारक राहील.

ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी

हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक राहणार आहे. ग्राहकांना केवळ बाटलीबंद पाणी खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही भर

अन्नातून होणारे आजार टाळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. स्वच्छ गणवेश, हातमोजे आणि हेडकव्हरचा वापर बंधनकारक करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी अन्न सुरक्षा प्रशिक्षण (FoSTaC) पूर्ण केलेले असणे आवश्यक राहणार आहे.

परवाना व मेन्यूमध्ये पारदर्शकता

सर्व आस्थापनांकडे वैध FSSAI परवाना असणे आणि तो ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मेन्यू कार्डवर पदार्थांतील कॅलरीज, पोषकतत्त्वे आणि ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांची माहिती देणे आवश्यक राहणार आहे. तसेच वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या आस्थापनांना दरवर्षी अन्न सुरक्षा ऑडिट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही

राज्यातील खाद्य व्यवसाय अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली असून सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कँटिन, क्लाउड किचन आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांना ती लागू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा FDA प्रशासनाने दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!