डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्याला यश; सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त यादीत शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांचे आभार

डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्याला यश; 

सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त यादीत

शेतकऱ्यांना दिलासा; 

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांचे आभार

सिंदखेडराजा : 

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, चिखली आणि लोणार तालुक्यात यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. अखेर शासनाने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. या निर्णयाने मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात डॉ. खेडेकर यांच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार  दुष्काळी परिस्थिती गंभीर होताच डॉ. खेडेकर यांनी सर्वप्रथम उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून देऊळगावराजा तालुक्यासह संपूर्ण सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या पिकांची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासनापुढे वस्तुस्थिती मांडली.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा दौऱ्यावेळी डॉ. खेडेकर यांनी सविस्तर निवेदन सादर करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, पीक विम्याची तातडीने नुकसानभरपाई, दुष्काळी सवलती लागू करणे आणि सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडेही स्वतंत्र निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

शासनाने या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची सकारात्मक दखल घेत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला. या निर्णयाने मतदारसंघातील शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती, मदत आणि इतर योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयाबद्दल डॉ. खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर होणारी आर्थिक मदत, पीक विम्याची नुकसानभरपाई आणि इतर दुष्काळी सवलती दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. खेडेकर म्हणाले, “दुष्काळग्रस्त घोषित होणे हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा पहिला टप्पा आहे. आता शासनाने जाहीर होणारी मदत आणि सर्व सवलती कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा पाठपुरावा यापुढेही कायम राहील.” 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

देऊळगावराजात राजकीय वादातून रक्तरंजित संघर्ष? दोन गट आमनेसामने; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, सात जखमी