विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदानाची दखल "गजानन काळुसे" डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदानाची दखल
"गजानन काळुसे" डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
किनगांवराजा :
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे कामक्षा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, किनगांव राजा येथील शिक्षक गजानन शिवाजी काळुसे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील पिंपरी-चिंचवडमधील नटसम्राट निळू फुले नाट्यसभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक गजानन काळुसे यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येवले अमृततुल्य ब्रँडचे संस्थापक व प्रमुख नवनाथ येवले, छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव काजी हैदर यांचे १३ वे वंशज सोहेल शमशुद्दीन शेख, प्रसिद्ध कवी, साहित्यिक व गझलकार कविता काळे तसेच स्विफ्ट अँड लिफ्टचे निलेश साबे यांच्या हस्ते गजानन काळुसे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण, साहित्य, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य
गजानन काळुसे हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते अध्यापन न करता विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा, संस्कार, शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि विविध कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.
शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि योग्य दिशा देण्याचे काम ते करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना शैक्षणिकदृष्ट्या पुढे नेण्याबरोबरच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठीही ते प्रयत्न करतात.
शाळेच्या विकासातही योगदान
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी गजानन काळुसे यांचे सातत्यपूर्ण योगदान राहिले आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी कार्यशैली निर्माण केली आहे.
शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो, या भूमिकेतून ते कार्यरत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्काराने जबाबदारी वाढली
हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याची पोचपावती असून, यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना गजानन काळुसे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी यापुढेही अधिक जोमाने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किनगांव राजा येथील शिक्षकाचा पुण्यात झालेला हा गौरव परिसरासाठी अभिमानाची बाब ठरला असून, त्यांच्या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या