‘पोलीस ठाण्यातच कपडे उतरवून मारहाण, फोटो काढून बदनामीची धमकी!’ किनगावराजा पोलिसांवर गंभीर आरोप; जातीय अपमान, बेकायदेशीर डांबून ठेवणे आणि मारहाणीचा ठपका —ठाणेदाराच्या निलंबनासह गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘पोलीस ठाण्यातच कपडे उतरवून मारहाण, 

फोटो काढून बदनामीची धमकी!’

किनगाव राजा पोलिसांवर गंभीर आरोप; 

जातीय अपमान, बेकायदेशीर डांबून ठेवणे आणि मारहाणीचा ठपका

—ठाणेदाराच्या निलंबनासह गुन्हा दाखल करण्याची मागणी

सिंदखेडराजा/प्रतिनिधी : 

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच कायद्याची पायमल्ली केल्याचा अत्यंत गंभीर आरोप सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथील प्रशांत मुंडे यांनी केला आहे. किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मार्तोडकर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाच्या आरोपांचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे सात वाजता प्रशांत मुंडे यांच्यासह योगेश मुंडे, गणेश बोडखे आणि शुभम घुगे या चौघांना किनगाव राजा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. कोणती तक्रार आहे, याची कोणतीही माहिती न देता चौघांना ठाणेदारांच्या कार्यालयात बोलावून अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

त्यानंतर त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले आणि “तुम्ही गावात जास्त माजले आहात, सोशल मीडियावर काहीही टाकता, कपडे काढून मारले पाहिजे”, अशा स्वरूपाची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच विशिष्ट समाजाच्या नावाने अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याचाही गंभीर दावा करण्यात आला आहे.

कपडे उतरवून मारहाण; बंद खोलीत डांबल्याचा आरोप

निवेदनातील आरोपांनुसार, चौघांना पोलीस ठाण्यालगतच्या एका खोलीत नेऊन त्यांचे कपडे उतरविण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर दरवाजा बंद करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. बुटासह पायावर पाय रगडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यावेळी “तुमच्यापैकी आमदाराचा माणूस कोण?” अशी विचारणा करण्यात येत होती, अशीही तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. संबंधितांनी उत्तर न दिल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ‘व्हायरल’ करण्याची धमकी?

या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक आरोप म्हणजे, कपडे उतरविल्यानंतर चौघांचे मोबाईलवर फोटो काढण्यात आले आणि ते फोटो गावातील ग्रुपमध्ये व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास गावातील सरपंच, ग्रामसेवक व इतरांकडून तक्रारी घेऊन उलट ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, कोणताही गुन्हा अथवा ठोस तक्रार नसताना त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून दोन ते तीन तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले, मारहाण करण्यात आली आणि नंतर धमकी देऊन सोडण्यात आले.

‘सीसीटीव्ही तपासा, सत्य बाहेर येईल’

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून २८ ऑगस्टच्या रात्रीचे पोलीस ठाण्यातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, असा ठाम आग्रह निवेदनात करण्यात आला आहे. तसेच इतर पुरावे गोळा करून ठाणेदार व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित अधिकारी तपासावर प्रभाव टाकू नयेत म्हणून त्यांची किनगाव राजा पोलीस ठाण्यातून तातडीने बदली अथवा निलंबन करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कारवाई नाही तर आंदोलनाचा इशारा

या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच न्यायालयामार्फतही पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.

कायद्याच्या रक्षकांवरच इतके गंभीर आरोप झाल्याने किनगाव राजा पोलीस ठाण्यातील कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी होणार का? सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य बाहेर येणार का? आणि संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

(टीप : वरील सर्व आरोप तक्रारदाराने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातील असून, संबंधित पोलिसांची बाजू अथवा अधिकृत चौकशीचा निष्कर्ष उपलब्ध झाल्यानंतर पुढील तथ्य स्पष्ट होईल.) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली