चार एकर शेती, वाढते कर्ज अन् हातातोंडाशी आलेले पीकही गेले; राताळीतील शेतकरी पुत्राने शेतात घेतला गळफास कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबाची करुण कहाणी; १० एकर शेतीवर अडीच लाखांचा खर्च, उत्पादन मात्र नगण्य

चार एकर शेती, वाढते कर्ज अन् हातातोंडाशी आलेले पीकही गेले; 

राताळीतील शेतकरी पुत्राने शेतात घेतला गळफास

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबाची करुण कहाणी; 

१० एकर शेतीवर अडीच लाखांचा खर्च, उत्पादन मात्र नगण्य


सिंदखेडराजा :

तालुक्यातील राताळी येथील एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबावर शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी काळाने घाला घातला. आर्थिक विवंचना, वाढते कर्ज आणि यंदाच्या पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर युवा शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील (वय २६) याने शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेने रताळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका कुटुंबाच्या आर्थिक संघर्षाचा अत्यंत वेदनादायी शेवट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

चार एकर शेतीवर पाच जणांचा संसार

आकाशचे वडील बळीराम पाटील यांच्याकडे अवघी चार एकर शेती आहे. याच शेतीच्या उत्पन्नावर पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र चार एकर शेतीतून मिळणारे उत्पन्न कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठीही अपुरे पडत होते.

परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी बळीराम पाटील आणि त्यांची दोन्ही मुले मिळेल ते शेतीकाम करीत होते. घरातील लक्ष्मीबाई पाटील यादेखील मोलमजुरी करून संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी हातभार लावत होत्या. शेती आणि मजुरीच्या उत्पन्नातून घरखर्च, शेतीचा खर्च आणि कर्जाची परतफेड यांचा मेळ घालण्याचा कुटुंबाचा सातत्याने प्रयत्न सुरू होता.

कर्ज वाढत गेले; कर्जमाफीच्या यादीकडे लागले होते डोळे

सन २०१९-२० मध्ये बळीराम पाटील यांनी भारतीय स्टेट बँकेकडून कृषी कर्ज घेतले होते. मात्र चार एकर शेतीच्या उत्पन्नातून या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यातच व्याजाचा भार आणि शेती उत्पादनातील घट यामुळे कर्जाचा ताण वाढत गेल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शासनाकडून कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही बळीराम पाटील यांचे नाव आले नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्याची आशा धूसर होत गेली.

दहा एकर शेती करण्यासाठी घेतली; अडीच लाखांचा खर्च, उत्पादनाने मात्र साथ सोडली

यावर्षी परिस्थिती सुधारावी, या अपेक्षेने आकाशने विठ्ठल गायकवाड यांची दहा एकर शेती करण्यासाठी घेतली होती. शेताची नांगरणी, वखरणी करून सोयाबीन आणि तुरीची पेरणी करण्यात आली. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिके चांगली बहरली होती. त्यामुळे यंदा तरी मेहनतीचे चीज होईल आणि आर्थिक संकटातून काहीसा मार्ग निघेल, अशी कुटुंबाची अपेक्षा होती.

मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठा खंड दिला आणि पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी करपली. दहा एकर शेतीसाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते.

सोयाबीनचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना प्रत्यक्षात एकरी ८० किलो उत्पादन मिळणेही कठीण झाले. त्यामुळे दहा एकर शेतीवर केलेला खर्चही भरून निघण्याची शक्यता मावळली. पिकाची सोंगणी करण्यासाठी लागणारा खर्चही निघणे कठीण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली.

कुटुंबाची आर्थिक विवंचना आकाशच्या मनावर

आकाश काही काळ संभाजीनगर येथे कामाला होता. काही दिवसांपूर्वी तो गावाकडे परतला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, वडिलांच्या डोक्यावर असलेले कर्ज आणि यंदाच्या पिकांचे झालेले नुकसान याची त्याला सतत चिंता होती, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

वडिलांचे कर्ज कमी होत नाही, कर्जमाफीच्या यादीत नाव आलेले नाही आणि यंदाच्या पिकातूनही अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, अशी परिस्थिती त्याच्या मनात खोलवर घर करून गेली होती. या सर्व आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगितले जात आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दूध काढण्यासाठी जातो सांगून घराबाहेर पडला अन्...

शुक्रवारी सकाळी आकाश घरातून दूध काढण्यासाठी शेताकडे जातो, असे सांगून बाहेर पडला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजू सरकटे हे शेतातील म्हशीचे दूध काढण्यासाठी जात असताना त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरील पळसाच्या झाडाला आकाश लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. आकाशने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांकडून पंचनामा; पुढील तपास सुरू

या घटनेप्रकरणी आकाशचा चुलत भाऊ सागर परशुराम पाटील यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे पाठविण्यात आला.

ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे पुढील तपास करीत आहेत.

‘शेती करायची तरी कशी?’ हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आकाशच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबातील तरुणाचा मृत्यू झाला नाही, तर अल्पभूधारक शेतकरी कुटुंबासमोर उभ्या असलेल्या आर्थिक संकटाचे विदारक चित्र पुन्हा समोर आले आहे. चार एकर शेती, वाढते कर्ज, शेतीच्या वाढत्या खर्चाचा भार आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक गणिते कोलमडत असल्याचे या घटनेतून दिसून येते.

शेतीत चांगले उत्पादन झाले तर कर्ज फेडण्याची आशा, आणि पीक हातचे गेले तर पुन्हा कर्जाचा डोंगर—या दुष्टचक्रात अडकलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाच्या मदतीची आवश्यकता असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

आकाशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण आणि नातेवाईक असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या तरुणाच्या अकाली निधनाने पाटील कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली