प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थ आक्रमक; आजी-माजी लोकप्रतिनिधींना गावबंदी! मुख्य प्रवेशद्वारावर निषेधाचा फलक; आमदारांच्या चर्चेनंतर फलक हटविला, मात्र प्रश्न कायम
प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थ आक्रमक;
आजी-माजी लोकप्रतिनिधींना गावबंदी!
मुख्य प्रवेशद्वारावर निषेधाचा फलक;
आमदारांच्या चर्चेनंतर फलक हटविला,
मात्र प्रश्न कायम
अहिल्यानगर/वृत्तसेवा :
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विकासकामांसह रस्ते, वीजपुरवठा आणि पाटपाण्याच्या प्रश्नांवरून बेलपिंपळगाव येथील ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आला. प्रश्न सोडविण्याच्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्ष कामे मार्गी लागत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट आजी-माजी आमदार-खासदारांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘प्रलंबित प्रश्न सुटेपर्यंत आजी-माजी लोकप्रतिनिधींना गावबंदी’ अशा आशयाचा निषेध फलक लावण्यात आल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली.
गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, मंजुरी मिळूनही रखडलेली कामे, निकृष्ट बांधकामाचे आरोप, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरिपाच्या हंगामात हक्काचे पाटपाणी वेळेवर न मिळणे, यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. पाणीप्रश्नावरून यापूर्वी रस्ता रोको आंदोलन करूनही अपेक्षित तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थांनी आता लोकप्रतिनिधींविरोधातच आक्रमक भूमिका घेतली.
माजी आमदार आले, दर्शन घेतले अन् निघून गेले!
गावबंदीचा फलक झळकत असतानाच ग्रामदैवत श्री रोकडोबा हनुमान यात्रा उत्सवानिमित्त माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गावात आले. त्यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. मात्र, यावेळी ग्रामस्थांकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही.
त्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी बेलपिंपळगावात येऊन ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. गावातील प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील अपेक्षित उपाययोजनांबाबत झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांनी मुख्य प्रवेशद्वारावरील निषेधाचा फलक हटविला.
मात्र, फलक हटला म्हणून प्रश्न सुटले, असे चित्र नाही. ग्रामस्थांचा मूळ रोष अद्याप कायम असून रस्ते, वीज आणि पाटपाण्याच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कामे कधी सुरू होणार, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
‘मंजुरी’च्या पलीकडे काम कधी?
बेलपिंपळगावातील मुख्य रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शेतीप्रधान असलेल्या या गावासाठी पाटपाणी हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मुळा किंवा प्रवरा पात्रातून मिळणारे पाटपाणी वेळेवर आणि नियोजनानुसार न मिळाल्यास खरिपातील पिकांचे मोठे नुकसान होते. दरवर्षी याच प्रश्नावर शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
ऐतिहासिक वारसा जपणारे गाव
बेलपिंपळगावाला केवळ सध्याच्या आंदोलनामुळेच नव्हे, तर ऐतिहासिक वारशामुळेही वेगळी ओळख आहे. हे गाव स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भावराव गोविंदराव चौगुले तसेच इंग्रजांविरोधात लढा उभारणारे आदिवासी योद्धे काळू नाईक यांचे गाव म्हणून ओळखले जाते.
ब्रिटिशकालीन आठवणी जपणाऱ्या गावातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेले सुमारे ९५ वर्षे जुने वटवृक्ष आणि कडुनिंबाची झाडे ग्रामस्थांनी आजही जपली आहेत. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या गावाला आता विकासाच्या प्रश्नांवरही ठोस न्याय मिळावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
फलक हटविण्यात आला असला तरी ग्रामस्थांचा सवाल मात्र कायम आहे—वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आता प्रत्यक्षात कधी सुटणार?

टिप्पण्या