सुषमा राऊत यांना ‘पत्रतपस्वी’ उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता पुरस्कार : : स्व. भोजराज गाडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त साखरखेर्डा येथे भव्य सोहळा

सुषमा राऊत यांना ‘पत्रतपस्वी’ उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता पुरस्कार

स्व. भोजराज गाडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त 

साखरखेर्डा येथे भव्य सोहळा



साखरखेर्डा | प्रतिनिधी

देऊळगावराजा येथील पत्रकार सुषमा राऊत यांना ग्रामीण पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘पत्रतपस्वी स्व. भोजराज नरहरी गाडेकर उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्व. भोजराज गाडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी साखरखेर्डा येथील पलसिद्ध महास्वामी मठाच्या सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला.

सुषमा राऊत यांच्यासह राजेश तोटे (खामगाव), मधुकर मोहिते (बिबी), सुखनंदन इंगळे (बुलडाणा) आणि राजेश दवणे (यवतमाळ) यांनाही उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी कवी, वक्ते व निवेदक अजीम नवाज राही यांनी स्व. भोजराज गाडेकर यांच्या पत्रकारिता कार्याचा गौरव करताना, त्यांच्या कुटुंबीयांनी स्मृतीग्रंथाच्या माध्यमातून वडिलांचा पत्रकारितेचा वसा पुढे नेणे ही पितृभक्तीची अविस्मरणीय अभिव्यक्ती असल्याचे प्रतिपादन केले. ‘पत्रतपस्वी’ ग्रंथप्रकाशन हा ग्रामीण पत्रकारितेच्या वाटेवरील मैलाचा दगड असल्याचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी सांगितले.

सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी संततीने वडिलांचा विचार, छंद आणि समर्पणाचा वारसा पुढे नेणे ही दुर्मीळ बाब असल्याचे सांगत, संतोष गाडेकर यांनी ‘पत्रतपस्वी’ ग्रंथासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी असल्याचे नमूद केले. भोजराज गाडेकर यांच्या सहवासातील व्यक्तींना लिहिते करून त्यांच्या आठवणी ग्रंथरूपाने जतन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पत्रतपस्वी स्व. भोजराज नरहरी गाडेकर यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या ग्रंथाचे डिजिटल कव्हरपेज रिबीन कापून प्रकाशित करण्यात आले. श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी व स्व. भोजराज गाडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व समईप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीपक आखरे व ज्ञानेश्वर राहाटे यांच्या स्वागतगीतांनी कार्यक्रमाला भावपूर्ण वातावरण प्राप्त झाले.

कार्यक्रमात दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. राजुरेश्वर ज्वेलर्सच्या वतीने विद्यार्थ्यांना वृक्षभेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अक्षय गणेश डोईफोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

दुधा येथील शिवकालीन युगंधर मैदानी खेळात पारंगत कु. पुनम वायसे यांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार युवराज रबडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव बेंडमाळी, माजी पंचायत समिती उपसभापती सुनील जगताप, सरपंचपती अमित जाधव, अॅड. अश्विनी सावजी, अॅड. निशिकांतराजे जाधव, जगदेव मराठे, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक नागरे, नंदकिशोर शिंगणे, लोकजागरचे प्रविण गीते, मॅथ्स कोचिंग क्लासेसचे संचालक शिवशंकर डुकरे पाटील, प्रा. दिलीप नाईकवाड, सवडदचे सरपंच गजानन देशमुख, दामोदर लांभाडे, आबासाहेब मोरे, भास्कर इंगळे, मो. पठाण, पंढरी शेळके, गोपाल मानतकर, दिलीपराव खंडारे, सूतगिरणीचे कार्यकारी संचालक बबनराव लोढे, सैय्यद रफीक, आयुबसेठ कुरेशी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रावसाहेब देशपांडे, यशराज ग्राफीक्सचे डिझायनर नारायण भोलवणकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, माजी सरपंच दाऊत कुरेशी, रमेश ठोसरे, मुख्याध्यापक विष्णू ठोसरे, पत्रकार डी. एन. पंचाळ, अशोक इंगळे, सचिन खंडारे, गजानन सरकटे, रवी वाघ, मनोज जाधव, संजय आंभोरे, रमेश जैवाळ आणि प्रभाकर धुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. निलेश गावंडे यांनी संतोष गाडेकर यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करताना, वडिलांच्या स्मृतीदिनाला केवळ कौटुंबिक कार्यक्रम न ठेवता पत्रकार आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करून सामाजिक कृतज्ञतेची किनार देण्यात आल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु. मयुरी गजानन झोरे यांनी केले, तर आभार मो. असलम अंजूम यांनी मानले. यावेळी ठाणेदार युवराज रबडे व सोहम जीवन गाडेकर यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजरावबापू देशमुख, सागर मगर, सोमेश्वर इंगळे, अरुण देशमुख, अविनाश राऊत, गोलू सूर्यवंशी, ज्ञानेश्वर राऊत, संजय देशमुख, दीपक गवळी, विलास आंभोरे, संजय गाडगे आणि शिवाजी लहाने यांनी परिश्रम घेतले.

स्व. भोजराज गाडेकर यांच्या पत्रकारितेच्या स्मृती जागविणाऱ्या या सोहळ्यात पत्रकार, गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा झालेला गौरव हा ग्रामीण भागातील सकारात्मक कार्याला प्रेरणा देणारा ठरला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

देऊळगावराजात राजकीय वादातून रक्तरंजित संघर्ष? दोन गट आमनेसामने; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, सात जखमी