दहीहंडीतील डीजेचा दणदणाट पडला महागात; पुण्यात ११६ मंडळांवर न्यायालयात खटले :: ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; १ हजार १०० मंडळांच्या आवाजाची तपासणी, मोठ्या ध्वनियंत्रणाही जप्त
दहीहंडीतील डीजेचा दणदणाट पडला महागात;
पुण्यात ११६ मंडळांवर न्यायालयात खटले
ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले;
१ हजार १०० मंडळांच्या आवाजाची तपासणी,
मोठ्या ध्वनियंत्रणाही जप्त
पुणे/वृत्तसेवा :
दहीहंडी उत्सवातील डीजेचा कर्णकर्कश दणदणाट पुणे शहरातील अनेक मंडळांना चांगलाच महागात पडला आहे. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे तसेच निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११६ मंडळांविरोधात थेट न्यायालयात खटले दाखल केले आहेत. याशिवाय निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या १० मंडळांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून, बेकायदेशीरपणे वापरण्यात आलेल्या मोठ्या ध्वनियंत्रणाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी यंदा ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या तब्बल १ हजार १०० दहीहंडी मंडळांच्या ध्वनीपातळीची नोंद घेण्यात आली. ध्वनीमापन यंत्रांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रीडिंगचे परीक्षण केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झालेल्या मंडळांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
पोलिसांनी सणापूर्वीच मंडळांना ध्वनिव्यवस्थेबाबत स्पष्ट सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार लाऊडस्पीकरसाठी ४ बेस आणि ४ टॉपपेक्षा अधिक उपकरणे वापरण्यास मर्यादा घालण्यात आली होती. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या प्रेशर मिड आणि प्लाझ्मा साऊंड उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून काही मंडळांनी छुप्या पद्धतीने ८ बेस आणि ८ टॉप अशा मोठ्या क्षमतेच्या ध्वनियंत्रणांचा वापर केल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ४ प्लाझ्मा स्पीकर्स, ४ प्रेशर मिड तसेच ६ हून अधिक मोठ्या ध्वनियंत्रणा जप्त केल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांसह संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आगामी सार्वजनिक उत्सवांमध्ये नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.
शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, विशेषतः मध्यवर्ती आणि अत्यंत गजबजलेल्या भागांमध्ये पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेतली. परिमंडळ १ आणि परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.
फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक मोठ्या मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने तसेच शक्तिशाली साऊंड सिस्टिमचा वापर केला जात असल्याने पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.
याशिवाय बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती असून, हडपसर, वानवडी, कोंढवा आणि सहकारनगर परिसरातील मंडळांवरही निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अनेक मंडळांवर थेट न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
दरम्यान, शेजारील पिंपरी-चिंचवड शहरातही कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. वाकड, हिंजवडी आणि पिंपरी परिसरातील तब्बल १६ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील वर्दळ लक्षात घेता ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
दहीहंडीतील या मोठ्या कारवाईनंतर आता आगामी गणेशोत्सवासाठीही पुणे पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले आहे. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर नियमावली लागू करण्यात आली असून, उत्सवाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही उत्सवाचा आनंद साजरा करण्यास कोणाचाही विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा कर्णकर्कश आवाज मात्र खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात डीजे, मोठ्या ध्वनियंत्रणा आणि निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचा वापर करणाऱ्या मंडळांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांच्या या कारवाईने एकीकडे उत्सवातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दुसरीकडे सार्वजनिक उत्सव साजरे करताना आनंदाबरोबरच कायदा, नियम आणि नागरिकांच्या आरोग्याचाही विचार करणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

टिप्पण्या