शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी खेडेकरांचा पालकमंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा : : पिकांचे नुकसान, पीक विमा व विद्युत पुरवठ्याचा प्रश्न; तातडीने आर्थिक मदतीची मागणी
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी खेडेकरांचा पालकमंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा
पिकांचे नुकसान, पीक विमा व विद्युत पुरवठ्याचा प्रश्न;
तातडीने आर्थिक मदतीची मागणी
सिंदखेडराजा :
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच विद्युत पुरवठ्याच्या समस्येमुळे दुहेरी संकटात सापडला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा जाधव पाटील यांच्याकडे केली.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री मकरंद आबा जाधव पाटील यांची माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील सद्यस्थितीची माहिती देत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
पावसाअभावी तसेच पावसातील खंडामुळे खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, अनेक भागांत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने केवळ पाहणी व पंचनाम्यांपुरते मर्यादित न राहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने आर्थिक मदत जमा करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी खेडेकर यांनी केली.
पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याबरोबरच पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमही तातडीने मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विशेषतः पिकांचे प्रत्यक्ष नुकसान झाले असताना मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना विविध प्रशासकीय प्रक्रियांचा सामना करावा लागू नये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण, पंचनामे आणि पात्रतेची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून मदत उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका खेडेकर यांनी मांडली.
वीज नसल्याने पिके वाळली; अशा शेतकऱ्यांनाही मदत द्या
दरम्यान, खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडेही पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. काही शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल अथवा अन्य माध्यमातून पाण्याची व्यवस्था उपलब्ध असतानाही वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे पिकांना पाणी देता आले नाही. परिणामी पिकांचे नुकसान झाले आहे.
अशा शेतकऱ्यांचाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत समावेश करून त्यांना शासनाच्या निकषांनुसार आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
वारंवार नादुरुस्त होणाऱ्या डीपींमुळे शेतकरी त्रस्त
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विद्युत डीपी वारंवार नादुरुस्त होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डीपी जळाल्यानंतर किंवा नादुरुस्त झाल्यानंतर त्या दुरुस्तीसाठी अथवा बदलण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही खेडेकर यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे ज्या ठिकाणी विद्युत डीपीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी अतिरिक्त डीपी तातडीने उपलब्ध करून द्यावेत आणि शेतीचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहून नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी, पंचनामे, पीक विमा आणि शासनाच्या मदतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी अपेक्षाही खेडेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, तालुकाप्रमुख सुदाम काकड, युवासेना सिंदखेडराजा विधानसभा संपर्कप्रमुख दीपक पवार, सरपंच निवृत्ती कठोरे, सतीश राजमाने यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या पातळीवर मांडून त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या