मंत्रालय पतसंस्थेत १ कोटी ६६ लाखांचा कथित गैरव्यवहार : : माजी अध्यक्षांसह १० जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा; फेरलेखापरीक्षणात अनेक आर्थिक अनियमितता उघड
मंत्रालय पतसंस्थेत १ कोटी ६६ लाखांचा कथित गैरव्यवहार
माजी अध्यक्षांसह १० जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा;
फेरलेखापरीक्षणात अनेक आर्थिक अनियमितता उघड
मुंबई/वृत्तसेवा :
दि महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेतील तब्बल १ कोटी ६६ लाख ९६ हजार रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या माजी अध्यक्षांसह व्यवस्थापक, संचालक, तत्कालीन पदाधिकारी तसेच लेखापरीक्षक अशा एकूण १० जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक उमेश गोपीनाथ तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
२०१७ ते २०२२ या आर्थिक वर्षांतील व्यवहारांचे फेरलेखापरीक्षण करण्यात आले असता संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या निधीचा नियमबाह्य वापर, कॅशबुकमधील नोंदींमध्ये तफावत, कर्ज व्यवहारांतील अनियमितता तसेच विविध कारणांसाठी करण्यात आलेल्या खर्चाबाबत फेरलेखापरीक्षणात आक्षेप नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे.
संस्थेच्या निधीतून आयकराचा भरणा?
फेरलेखापरीक्षणानुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात न आलेला आयकर संस्थेच्या निधीतून भरल्याचा आरोप आहे. तसेच आकस्मिक निधी, सभासद सहाय्य निधी आणि इमारत निधीचा वापर करताना नियमांचे उल्लंघन करून अवाजवी खर्च करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सभासदांना वितरित करण्यात आलेला लाभांश आणि संस्थेच्या कॅशबुकमध्ये नोंदविण्यात आलेल्या रकमा यामध्ये मोठी तफावत आढळल्याचा दावा फेरलेखापरीक्षण अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय सुवर्ण कर्जाच्या व्यवहारांमध्येही अनियमितता झाल्याचे तपासणीत समोर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शिबिरे, दिवाळी भेटवस्तू अन् फर्निचरच्या खर्चावरही आक्षेप
शैक्षणिक शिबिरे, दिवाळी भेटवस्तू, वार्षिक सभा तसेच फर्निचर खरेदी अशा विविध बाबींवर नियमबाह्य पद्धतीने खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या हजेरीपटात फेरफार करून त्यांना नियमबाह्य पद्धतीने विविध भत्ते वितरित केल्याचेही फेरलेखापरीक्षणात नमूद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या सर्व व्यवहारांमुळे संस्थेच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप असून, संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
माजी जनरल मॅनेजरवर गंभीर आरोप
या प्रकरणातील प्रमुख संशयितांमध्ये पतसंस्थेचे माजी जनरल मॅनेजर रामचंद्र गोपाळ तावडे यांचा समावेश आहे. त्यांनी पदाचा गैरवापर करून विदेशवारीसाठी संस्थेच्या निधीचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप फेरलेखापरीक्षणात करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा पात्रता पूर्ण करीत नसतानाही नियमबाह्य पद्धतीने संस्थेत भरती केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
लेखापरीक्षकही पोलिसांच्या रडारवर
विशेष म्हणजे, संस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये कथित अनियमितता आणि तफावत असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून खोटे अथवा वस्तुस्थिती लपविणारे अहवाल तयार केल्याचा आरोप लेखापरीक्षकांवरही करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित लेखापरीक्षकांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
माजी अध्यक्ष, संचालक, तत्कालीन पदाधिकारी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित इतर व्यक्तींवर संस्थेच्या निधीच्या कथित गैरवापराची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने पोलिस तपास सुरू आहे.
या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, फेरलेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित नोंदींच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासादरम्यान स्पष्ट होणार आहे.

टिप्पण्या