ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच दोन तासांत आरोपीला अटक; किनगावराजा पोलिसांची धडाकेबाज कारवाई :: तढेगावातील प्रकरण : मारहाणीसह जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच दोन तासांत आरोपीला अटक;
किनगावराजा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
तढेगावातील प्रकरण :
मारहाणीसह जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
किनगावराजा | वृत्तसेवा
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात किनगावराजा पोलिसांना यश आले. तढेगाव येथे १० सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी वैभव गजानन मांटे (वय २६) याच्यावर मारहाण, जातिवाचक शिवीगाळ तसेच अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तढेगांव येथील कुसुम राधाकिसन सावळे (वय ५३) यांनी ग्रामीण रुग्णालय, बीबी येथे दिलेल्या जबाबावरून ही कारवाई करण्यात आली. १० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता आरोपी वैभव मांटे हा फिर्यादीच्या घरासमोरील अतिक्रमित जागेत टिनशेड व मुरूम टाकत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
यावेळी फिर्यादीने आरोपीला टिनशेड व मुरूम काढून घेण्यास सांगितले. मात्र, आरोपीने “मी उचलत नाही, तुला काय करायचे ते कर” असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली आणि फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घरात आणलेल्या तणनाशकाच्या पुडीतील पाणी एका ग्लासमध्ये घेऊन त्यात चमचा टाकून पिण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
या जबाबावरून किनगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२), ३५१(२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. ठाणेदार सपोनि संजय मातोंडकर यांनी पोलीस पथकासह ग्राम तढेगाव येथे जाऊन आरोपी वैभव मांटे याचा शोध घेतला. आरोपीचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आले असून कोठडीत ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, पोलीस ठाणे अधिकारी किनगावराजा तसेच पोलीस पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

टिप्पण्या