अवैध दारु विक्री बंद करायला गेलेल्या महिला सरपंच आणि ग्रामस्थांसोबत ठाणेदारांचे उद्धट वर्तन; वातावरण तापले; तात्काळ निलंबनाची मागणी

अवैध दारु विक्री बंद करायला गेलेल्या 

महिला सरपंच आणि ग्रामस्थांसोबत ठाणेदारांचे उद्धट वर्तन; 

वातावरण तापले; तात्काळ निलंबनाची मागणी

सिंदखेडराजा:-

तालुक्यातील हिवरखेड पूर्णा गावातील ग्रामस्थांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथे जोरदार तक्रार अर्ज दाखल केला आहे. अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या लोकनियुक्त महिला सरपंच, महिला आणि गावकऱ्यांशी ठाणेदार संजय मातोंडकर यांनी अत्यंत अपमानास्पद आणि उद्धट वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

गावात वाढलेल्या अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक शांतता धोक्यात आली असून महिला आणि नागरिकांना नाहीकारण त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ग्रामसभेचा ठराव घेऊन सनदशीर मार्गाने तक्रार करण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी सरपंच करुणा भारत वाघमारे, महिला आणि ज्येष्ठ गावकरी पोलिस स्टेशनला गेले होते.

मात्र ठाणेदार संजय मातोंडकर यांनी कोणतीही चौकशी न करता उलट तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधी, महिला आणि गावकऱ्यांशी अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि उद्दट वागणूक दिल्याचा आरोप आहे. विशेषतः महिलांची अवहेलना करून त्यांना अपमानित केल्यामुळे संपूर्ण गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. ठाणेदार संजय मातोंडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची तात्काळ स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, गावातील अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कडक कारवाई करावी आणि १९ ऑगस्ट रोजीच्या पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी आहे.

जर तात्काळ कारवाई झाली नाही तर १० सप्टेंबर २०२६ पासून लोकशाही मार्गाने आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचनाही देण्यात आली आहे.

ही तक्रार मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, जिल्हाधिकारी बुलडाणा आणि तहसिलदार सिंदखेडराजा यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.

तक्रारीवर सह्या करणारे प्रमुख ग्रामस्थ आणि पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत:

सौ. करुणा भारत वाघमारे (लोकनियुक्त सरपंच), नामदेव शिवहरी कुटे (ग्रामपंचायत सदस्य), रमेश विश्वनाथ नागरे, सौ. शकुंतला ज्ञानदेव नागरे (ग्रामपंचायत सदस्य), सौ. सुनिता वसंता काकडे (ग्रामपंचायत सदस्य), विलास रामभाऊ वाघ (तंटामुक्ती अध्यक्ष), बाबासाहेब दगडू कुटे (जिल्हा सचिव, भाजपा युवा मोर्चा, बुलडाणा), विश्वनाथ विर (माजी उपसरपंच), अशोक किसन काकडे, मंजुळाबाई जालिंदर वाघमारे, भारत वाघमारे, ज्ञानदेव नागरे, वर्षा संतोष वाघ, रत्ना देवेंद्र काकडे, मंगल प्रकाश वाघमारे आणि मिरा वानखेडे यांच्यासह सुनिता गजानन नागरे, चंद्रभागा विलास वाघ, सरस्वती रमेश नागरे, अलका गणेश नागरे, गीता समाधान नागरे, कमल जनार्दन कुटे, सुरेखा संदीप नागरे, निर्मला समाधान कुटे, मंजुळाबाई कारभारी नागरे, अलका दिलीप नागरे, सीमा कारभारी नागरे, सुमन भगवान नागरे, भाग्यश्री ज्ञानदेव नागरे, आशा नामदेव कुटे, अर्चना अनिल कुटे, कावेरी विनोद कुटे, आदी अनेक महिला आणि ग्रामस्थांनीही तक्रारीला पाठिंबा दर्शवून सह्या केल्या आहेत.

ग्रामस्थांचा संताप स्पष्ट आहे. पोलिसांकडे न्याय मागायला गेल्यावर अपमान सहन करावा लागतो, अशी भावना गावात रोषातून व्यक्त होत आहे. अवैध दारूच्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या महिला सरपंच आणि गावकऱ्यांना अपमानास्पद व उद्धट वागणूक देणे ही गंभीर बाब असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली