भोंदूबाबा अशोक खरात आणखी अडचणीत; मनी लाँड्रिंग प्रकरणात सहा जणांना समन्स ४७.७४ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा ईडीकडून तपास; ६० बेनामी बँक खाती, ५२ संशयित मालमत्तांची कागदपत्रे तपासाच्या रडारवर
भोंदूबाबा अशोक खरात आणखी अडचणीत;
मनी लाँड्रिंग प्रकरणात सहा जणांना समन्स
४७.७४ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा ईडीकडून तपास;
६० बेनामी बँक खाती, ५२ संशयित मालमत्तांची कागदपत्रे तपासाच्या रडारवर
मुंबई/वृत्तसेवा :
नाशिकचा कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने अशोक खरातसह त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेत सर्व आरोपींना समन्स बजावले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यास प्रथमदर्शनी पुरेसा आधार असल्याचे नमूद केले आहे. सर्व आरोपींना २२ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ईडीच्या तपासानुसार, अशोक खरात हा तब्बल ४७.७४ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. धार्मिक श्रद्धा, अंधश्रद्धा, भीती आणि कथित दैवी शक्तींच्या नावाचा वापर करून भाविकांकडून पैसे उकळल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार असल्याचे भासवून भाविकांवर प्रभाव निर्माण केला जात असल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते.
भाविकांच्या कागदपत्रांचा गैरवापर; ६० बेनामी खाती
तपासात आर्थिक व्यवहारांचा माग काढताना धक्कादायक बाबी समोर आल्याचा ईडीचा दावा आहे. भाविकांच्या कागदपत्रांचा कथित गैरवापर करून तब्बल ६० बेनामी बँक खाती उघडण्यात आली. या खात्यांमधून २०२१ ते २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार झाल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. या व्यवहारांचा नेमका स्रोत, त्यातून कोणाला आर्थिक लाभ झाला आणि पैसा कुठे वळविण्यात आला, याचा तपास सध्या सुरू आहे.
शेतकऱ्याच्या जमिनीवरही डोळा?
शिर्डी परिसरातील एका गरीब शेतकऱ्याच्या धार्मिक भावना आणि भीतीचा कथित फायदा घेत त्याला मौल्यवान जमीन अत्यल्प किमतीत विकण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोपही तपासात करण्यात आला आहे. या व्यवहारातून पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. या व्यवहाराचा आर्थिक प्रवाह आणि त्यातील संबंधित व्यक्तींची भूमिका तपासण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे.
या प्रकरणात न्यायालयाने अशोक खरात याच्यासह त्याची पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, नामकरण आवारे, अविनाश कांडेक आणि मिलिंद बंकर यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया आता पुढे सरकणार आहे.
१७ हून अधिक गुन्हे; एसआयटीकडून स्वतंत्र तपास
अशोक खरात गेल्या २० मेपासून तुरुंगात असल्याचे सांगण्यात येते. त्याच्याविरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांशी गैरवर्तन, फसवणूक, कथित काळी जादू आणि इतर गंभीर आरोपांशी संबंधित १७ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी १२ प्रमुख गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे.
एसआयटीच्या तपासादरम्यान खरातच्या कार्यालयातून आणि आश्रमातून काही इंग्रजी अक्षरे, विशिष्ट अंक, रुद्राक्ष तसेच संशयास्पद स्वरूपाचे हिरव्या रंगाचे द्रव्य जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या वस्तूंचा कथितपणे लोकांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी किंवा त्यांना भुरळ पाडण्यासाठी वापर केला जात होता का, याचा तपास करण्यात येत आहे.
महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप; व्हिडिओही हाती
तपास यंत्रणांच्या हाती पीडित महिलांना कथितपणे ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आलेले काही व्हिडिओ लागल्याचेही समोर आले आहे. या व्हिडिओंचा वापर नेमका कशासाठी आणि कोणाकडून करण्यात आला, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे अशोक खरातविरुद्धच्या प्रकरणाला आता आर्थिक गैरव्यवहारासोबतच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचीही पार्श्वभूमी मिळाली आहे.
५२ बेनामी मालमत्तांची कागदपत्रे तपासाच्या कक्षेत
दरम्यान, खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावाशी संबंधित तब्बल ५२ बेनामी मालमत्तांची कागदपत्रे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती आहे. या मालमत्ता कोणाच्या पैशातून खरेदी करण्यात आल्या, त्यांचा प्रत्यक्ष लाभार्थी कोण आहे आणि कथित आर्थिक गैरव्यवहारातील पैसा या मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आला का, याचा शोध घेतला जात आहे.
खरातच्या कथित बेनामी संपत्तीचा आणि त्याच्या परदेश दौऱ्यांचा आर्थिक स्रोत शोधण्यासाठी आयकर विभाग, मुद्रांक शुल्क विभाग आणि पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आगामी काळात आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी-विक्री आणि परदेश प्रवास यासंदर्भात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
एकीकडे महिलांशी संबंधित गंभीर आरोपांचा एसआयटीकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे ४७.७४ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडीकडून सुरू असल्याने अशोक खरात याच्याभोवती तपास यंत्रणांचा फास अधिकच घट्ट होत असल्याचे चित्र आहे. आता २२ सप्टेंबर रोजी विशेष पीएमएलए न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या