श्री व्यंकटेश महाविद्यालयात विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री व्यंकटेश महाविद्यालयात विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न


देऊळगाव राजा (प्रतिनिधी) : 

स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दीक्षारंभ समारोहाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी दीक्षारंभ विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध विद्यार्थी विकासाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. नव्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील संधींचा पुरेपूर उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त तथा श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करावे. शिक्षणासोबतच स्वतःसाठी विशिष्ट ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सातत्य, शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांचा आधार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सुविधा व उपक्रम उपलब्ध करून देत असून, विद्यार्थ्यांनी त्याचा सक्रियपणे लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध शाखा व विभागांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. कला शाखेविषयी प्रा. डॉ. अनंत आवटी, वाणिज्य शाखेविषयी प्रा. डॉ. विनोद बन्सीले आणि विज्ञान शाखेविषयी प्रा. डॉ. अरविंद कानवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध शाखांमधील अभ्यासक्रम, शैक्षणिक संधी तसेच भविष्यातील करिअरच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या संधींबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

महाविद्यालयातील ग्रंथालयाची कार्यपद्धती व उपलब्ध सुविधांविषयी प्रा. डॉ. उमेश देशमुख, तर आयक्युएसीविषयी प्रा. डॉ. एकनाथ भालेराव यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाविषयी प्रा. डॉ. रामेश्वर माने यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेनेविषयी प्रा. डॉ. महेश तांदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

क्रीडा क्षेत्रातील संधी व महाविद्यालयातील उपलब्ध क्रीडा सुविधांची माहिती प्रा. डॉ. किरण मोगरकर यांनी दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी यासाठी कार्यरत असलेल्या विद्यार्थी करिअर कट्ट्याविषयी प्रा. ज्ञानेश्वर शिंब्रे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या, तक्रारी व त्यांचे निराकरण यासाठी कार्यरत असलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीविषयी प्रा. डॉ. ज्योती ढोकले यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग, ग्रंथालय तसेच विज्ञान विभागातील विविध प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील सुविधा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक व इतर उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचा परिचय विद्यार्थी दीक्षारंभ समितीचे प्रमुख प्रा. डॉ. गजानन तांबडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीक्षापुत्र बिऱ्हाडे व प्रा. डॉ. रवींद्र गणबास यांनी केले, तर प्रा. गोविंद ढगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन जीवनाची सकारात्मक व प्रेरणादायी सुरुवात घडवून आणणारा हा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली