सिंदखेडराजाच्या ‘मातृतीर्थ राजमाता जिजाऊ स्मारका’साठी ५० कोटींचा निधी मंजूर :: माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीला शासनाची सकारात्मक दखल; विशेष अनुदानातून निधी उपलब्ध होणार
सिंदखेडराजाच्या ‘मातृतीर्थ राजमाता जिजाऊ स्मारका’साठी ५० कोटींचा निधी मंजूर
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीला शासनाची सकारात्मक दखल;
विशेष अनुदानातून निधी उपलब्ध होणार

शासन निर्णयाची प्रत एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना सुपूर्द करताना.
सिंदखेडराजा : राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा शहरातील ‘मातृतीर्थ राजमाता जिजाऊ स्मारक’ परिसराच्या अनुषंगिक विकासकामांसाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीची शासनाने दखल घेत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे सिंदखेडराजाच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी १४ जुलै २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सिंदखेडराजा नगरपरिषद अंतर्गत ‘मातृतीर्थ राजमाता जिजाऊ स्मारक’ येथे अनुषंगिक विकासकामे करण्यासाठी ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
निवेदनात सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असून महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हे अत्यंत ऐतिहासिक व प्रेरणादायी मातृतीर्थ असल्याचे नमूद करण्यात आले होते. दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक आणि भाविक सिंदखेडराजाला भेट देतात. त्यामुळे जिजाऊ स्मारक परिसराचा व्यापक व नियोजनबद्ध विकास, पर्यटक व भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तसेच सिंदखेडराजा शहराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याची गरज असल्याचे डॉ. खेडेकर यांनी निवेदनात स्पष्ट केले होते.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून सिंदखेडराजा नगरपरिषद, जि. बुलढाणा येथील ‘मातृतीर्थ राजमाता जिजाऊ स्मारक येथे अनुषंगिक कामे करणे’ या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार या प्रकल्पाचा १०० टक्के खर्च राज्य शासनाचा राहणार आहे. प्रकल्पातील कामांना सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे, ई-निविदा प्रक्रियेद्वारे कामे करणे तसेच निधी मंजूर केलेल्या उद्देशासाठीच खर्च करणे यांसह विविध अटी व शर्ती शासनाने निश्चित केल्या आहेत. प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा पर्यटन विकास महामंडळ राहणार असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
या निधीतून जिजाऊ स्मारक परिसराचा विकास, पर्यटक व भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, परिसराचे सौंदर्यीकरण आणि अन्य अनुषंगिक विकासकामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला पर्यटनाच्या नकाशावर अधिक प्रभावी स्थान मिळण्यास मदत होणार आहे.
डॉ. खेडेकर यांच्या पाठपुराव्याला यश
सिंदखेडराजाच्या ऐतिहासिक व पर्यटन महत्त्वाचा विचार करून स्मारक परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध व्हावा, यासाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासनाकडे मागणी केली होती. त्यांच्या निवेदनानंतर अवघ्या काही कालावधीत शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे सिंदखेडराजाच्या पर्यटन विकासाला नवे पर्व सुरू होण्याची अपेक्षा असून, या निधीतून होणारी कामे दर्जेदार, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
टिप्पण्या