शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना हायकोर्टाचा दणका! जामीन मंजूर; पण महाराष्ट्रात प्रवेशबंदी — चार्जशीट होईपर्यंत गोव्यात राहण्याचे आदेश

शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना हायकोर्टाचा दणका!

जामीन मंजूर; पण महाराष्ट्रात प्रवेशबंदी 

— चार्जशीट होईपर्यंत गोव्यात राहण्याचे आदेश

मुंबई/वृत्तसेवा :

डोंबिवलीतील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने आरोपींवर घातलेल्या कठोर अटींमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

जामीन मिळाला… पण महाराष्ट्रात येता येणार नाही!

उच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे आणि सहआरोपींना महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. जामीन कालावधीत रमेश म्हात्रे यांनी गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करायचे असून, आठवड्यातून तीन वेळा अंजुना पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पासपोर्टही न्यायालयात जमा!

न्यायालयाने आरोपींना त्यांचे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारदार, पीडित डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी किंवा कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधणे, त्यांच्यावर दबाव आणणे अथवा तपासातील पुराव्यांशी छेडछाड करणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

न्यायालयाने या कठोर अटी घालण्यामागे पीडित डॉक्टरांवर दबाव येऊ नये आणि तपासातील पुरावे सुरक्षित राहावेत, हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवून ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने या खटल्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि खटला सुरू झाल्यानंतर मध्येच त्यांच्यात बदल करू नये, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

दरम्यान, सुनावणीसाठी पीडित डॉक्टरांना न्यायालयात उपस्थित राहावे लागल्यास त्यांच्या अनुपस्थितीबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ऑन-ड्युटी असलेल्या महिला डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना रमेश म्हात्रे व त्यांच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

या प्रकरणात सुरुवातीला कल्याण न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्या निर्णयात हस्तक्षेप करत आरोपींना सरेंडर करण्याचे निर्देश दिले होते.

आता प्रकृतीची कारणे आणि प्रकरणातील विविध कायदेशीर बाबी विचारात घेत उच्च न्यायालयाने पुन्हा जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना घातलेल्या कठोर अटींमुळे हा जामीन म्हणजे आरोपींना पूर्ण मोकळीक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


जामीन मंजूर… पण महाराष्ट्रात प्रवेशबंदी!

गोव्यात वास्तव्य… आठवड्यातून तीन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी… पासपोर्ट न्यायालयात जमा!


त्यामुळे रमेश म्हात्रे यांच्या जामीन आदेशाचीच सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला