महसूल कर्मचारी पुन्हा संपाच्या पवित्र्यात! देऊळगावराजा हल्ला प्रकरणातील आरोपींवर कारवाई न झाल्याने सिंदखेडराजा तहसीलचे अधिकारी-कर्मचारी १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजेवर

महसूल कर्मचारी पुन्हा संपाच्या पवित्र्यात!

देऊळगावराजा हल्ला प्रकरणातील आरोपींवर कारवाई न झाल्याने 

सिंदखेडराजा तहसीलचे अधिकारी-कर्मचारी 

१ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजेवर


सिंदखेडराजा/प्रतिनिधी :

देऊळगावराजा येथे अवैध गौणखनिज वाहतूक प्रतिबंधक पथकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने महसूल विभागात निर्माण झालेला असंतोष आता सिंदखेडराजापर्यंत पोहोचला आहे. आरोपींवर ठोस आणि कठोर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे तहसील प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

देऊळगावराजा तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी २४ ऑगस्टपासून सामूहिक रजेवर आहेत. या आंदोलनाला सिंदखेडराजा येथील महसूल कर्मचाऱ्यांनी २७ ऑगस्ट रोजी पाठिंबा दिला होता. त्यानंतर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार २९ ऑगस्ट रोजी आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

मात्र, ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करावी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निर्णयाचे रीतसर निवेदन सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे यांना देण्यात आले. निवेदनावर महसूल उपविभागीय अध्यक्ष विवेक जगताप, नायब तहसीलदार डॉ. प्रविण वराडे, निवासी नायब तहसीलदार एस. डी. बंगाळे, निरीक्षण अधिकारी एस. आर. फाले, नायब तहसीलदार एस. बी. रोकडे, सहाय्यक महसूल अधिकारी आर. आर. काळे, जे. के. नागरे, एन. एम. खरात, महसूल सहाय्यक के. डी. इंगोले, एल. डी. शिंगणे, जे. एन. शिपे, मनोहर चेके, एस. एस. सोनुने, शिपाई डी. एन. बनकर, अनंता वाटारे, एस. डी. अंभोरे, शिवाजी शिंदे, महसूल सेवक अध्यक्ष संजय आटोळे, महसूल सेवक राजू खरात यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तहसीलच्या कामकाजावर परिणामाची शक्यता

सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सामूहिक रजेवर गेल्यास महसूल व प्रशासकीय कामकाज, दाखले, नोंदी, नागरिकांची विविध कामे तसेच शासकीय योजनांशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वी प्रशासन आरोपींवर कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कारवाईच्या मागणीवर प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

देऊळगावराजात राजकीय वादातून रक्तरंजित संघर्ष? दोन गट आमनेसामने; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, सात जखमी