रेतीचा टिप्पर अडवून सहा लाखांची मागणी केल्याचा आरोप :: ‘पैसे दिल्याशिवाय वाहने जाऊ देणार नाही’; शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

रेतीचा टिप्पर अडवून सहा लाखांची मागणी केल्याचा आरोप

‘पैसे दिल्याशिवाय वाहने जाऊ देणार नाही’; 

शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

लोणार/वृत्तसेवा :

रेती वाहतूक करणारा टिप्पर अडवून त्याच्या मालकाकडून सहा लाख रुपयांची मागणी केल्याचा तसेच पैसे न दिल्यास वाहने पुढे जाऊ देणार नसल्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमोल प्रभाकर पालकर (रा. किनगाव जट्टू, ता. लोणार, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध विवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरनुसार, दुर्गेश दिलीप अवचार (वय २५) हे एका रिअल इस्टेट कंपनीत मागील तीन वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करतात. संबंधित कंपनीने खापरखेड लाड शिवारातील पूर्णा नदीपात्रातून शासनाच्या नियमानुसार रेतीघाट घेतला असून, तेथून रॉयल्टीच्या पावत्यांसह टिप्परद्वारे रेती वाहतूक केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

२९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळपासून खापरखेड लाड शिवारातील रेती स्टॉक पॉइंटवरून रॉयल्टीसह रेतीची वाहतूक सुरू होती. त्यावेळी दुर्गेश अवचार हे रॉयल्टीची पावती देण्याचे काम करीत होते. याचदरम्यान एमएच २८ बीबी ९७८९ क्रमांकाचा सहा चाकी टिप्पर दोन ब्रास रेती घेऊन खापरखेड लाड येथून किनगाव जट्टूमार्गे मेहकरकडे जात होता.

एफआयआरमधील तक्रारीनुसार, किनगाव जट्टूजवळील नदीपुलाच्या परिसरात संबंधित टिप्पर अडविण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराला घटनास्थळी बोलावून ‘रेतीचा स्टॉक उचलणे सुरू आहे. त्यासाठी तुझ्या मालकाकडून सहा लाख रुपये घेऊन दे; अन्यथा येथून वाहने जाऊ देणार नाही’, अशी मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने संबंधित व्यक्तीला काही अडचण असल्यास ती कंपनीच्या मालकाला सांगावी आणि रेतीची वाहने अडवू नयेत, असे सांगितल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. मात्र, त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यापूर्वीदेखील अशाच प्रकारे रेती वाहने अडवून पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकारामुळे आपल्याला संबंधित व्यक्तीपासून जीविताचा धोका असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १२६(२), ३०८(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरची नोंद ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.५४ वाजता करण्यात आली असून, घटनेची वेळ २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताची नमूद आहे.

दरम्यान, एफआयआरमध्ये करण्यात आलेले आरोप हे तक्रारदाराच्या जबानीवर आधारित असून, त्यांची सत्यता तपासण्याचे काम पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

देऊळगावराजात राजकीय वादातून रक्तरंजित संघर्ष? दोन गट आमनेसामने; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, सात जखमी