शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो; अमित ठाकरेंचा संताप! मनसे कार्यकर्त्यांनी फोटो उतरवला; ‘महापुरुषांच्या बरोबरीने राजकीय नेत्यांचे फोटो नको’ — महाविद्यालय प्रशासनाला ठणकावले!
शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो;
अमित ठाकरेंचा संताप!
मनसे कार्यकर्त्यांनी फोटो उतरवला; ‘महापुरुषांच्या बरोबरीने राजकीय नेत्यांचे फोटो नको’
— महाविद्यालय प्रशासनाला ठणकावले!
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी प्राचार्यांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर तीव्र आक्षेप घेतला. ‘महापुरुषांच्या शेजारी कोणत्याही राजकीय नेत्याचा फोटो नको’, अशी भूमिका घेत अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोदींचा फोटो तेथून काढण्यास सांगितले.
अमित ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देताना विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि मेसमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रारी केल्या. विद्यार्थ्यांनी मेसमधील परिस्थितीचे फोटोही त्यांना दाखवले. कॅन्टीनमध्ये सडलेले कांदे वापरले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अमित ठाकरे यांनी संबंधित प्रशासनाला जाब विचारला.
या प्रश्नावरून प्राचार्यांच्या कार्यालयात चर्चा सुरू असतानाच एका विद्यार्थ्याने भिंतीवर लावलेल्या छायाचित्रांकडे अमित ठाकरे यांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या अगदी शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला असल्याचे दिसताच अमित ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो कशासाठी? उद्या देवघरातही मोदींचा फोटो लावणार का?” असा सवाल त्यांनी प्रशासनाला केल्याचे वृत्त आहे. महापुरुषांच्या प्रतिमांच्या बरोबरीने कोणत्याही विद्यमान राजकीय नेत्याचे छायाचित्र लावणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींच्या फोटोला विरोध नसून महापुरुषांच्या प्रतिमांच्या शेजारी राजकीय नेत्यांची छायाचित्रे लावण्याच्या पद्धतीला विरोध असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. फोटो लावायचाच असेल तर तो स्वतंत्रपणे आणि नियमांनुसार लावावा; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या शेजारी लावू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यानंतर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र भिंतीवरून खाली उतरवले. त्यामुळे काही काळ महाविद्यालयातील वातावरण चांगलेच तापले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही आक्रमक भूमिका
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली. वसतिगृहातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि मेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत तातडीने सुधारणा न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी भूमिका मांडली. तसेच शिवरायांच्या प्रतिमेच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो लावण्याच्या निर्णयाचे भाजप नेते समर्थन करणार आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारेंकडून समर्थन
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. अमित ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला वैयक्तिक विरोध केला नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र नसावे, ही भूमिका घेतली आहे; ती योग्य असल्याचे अंधारे यांनी म्हटले.
या संपूर्ण प्रकारामुळे महापुरुषांच्या प्रतिमांसोबत विद्यमान राजकीय नेत्यांची छायाचित्रे लावण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या