मलकापूर पांग्रा येथे कोरोना पॉझिटिव्ह बालिका आढळल्याने एकच खळबळ
मलकापूर पांग्रा येथे कोरोना पॉझिटिव्ह बालिका आढळल्याने एकच खळबळ
कुटुंबियांसह कालच मुंबईहून परतली होती घरी
आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सतर्क
मुलीसह तेरा जणांना केले बुलडाणा रवाना
सिंदखेडराजा:- किडनी आजाराच्या उपचारासाठी मुंबईला कुटुंबियांसह जाऊन, अचानक तालुक्यातील मलकापूर पांग्रा प्रा. आ. केंद्रांतर्गत पांग्रा येथे काल दि. १३ मे रोजी परतलेली ८ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. ह्या प्रकरणी प्रशासनाने तातडीने पावले उचलत मुलीसह हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील १३ व्यक्तींना तपासणी व उपचारासाठी बुलडाणा येथे पाठविले आहे.
मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पांग्रा येथील एका ८ वर्षीय मुलीला किडनी विकाराने ग्रासल्याने, तिच्या कुटुंबीयांनी दोन महिन्यांपूर्वी उपचारासाठी मुंबई गाठली होती. जे. जे. इस्पितळात दोन महिन्यांपासून या मुलीवर उपचार सुरु होते. याच दरम्यान कोविड १९ रोगाचा प्रसार मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तसेच ह्या मुलीला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी तिचा स्वॅब नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र इस्पितळ प्रशासनाला मुलगी बेडवर आढळून आली नाही. मुलगी व तिचे कुटुंबीयांनी प्रशासनातील कुणालाही कोणतीच कल्पना दिल्याविनाच जे. जे. इस्पितळ सोडत काल दि. १३ मे रोजी सकाळी २ वा. सुमारास मलकापूर पांग्रा येथे घर गाठले होते. त्यामुळे मुंबई येथील प्रशासकीय यंत्रणेकडून मूळ गावाच्या संबंधित जिल्हा यंत्रणेला यासंदर्भात कळविले. त्यांनी लगोलग तालुका प्रशासनाला कल्पना दिल्याने तातडीने हालचाली करीत मलकापूरचा पांग्रा हा भाग सीलबंद केला. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलीसह तिच्या संपर्कातील १३ व्यक्तींना तीन रुग्णवाहिकांमधून पुढील तपासणी व उपचारासाठी बुलडाणा येथे रवाना केले आहे. मलकापूर पांग्रा हे अचानकच हॉटस्पॉट ठरल्याने आज धडकलेल्या मुलीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या वृत्तामुळे सिंदखेडराजा तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
तर मलकापूर पांग्रा येथे प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏