माजी आ. सपकाळ यांच्या गच्छंतीमागे मातृतीर्थ मतदार संघातील घडामोडी ..??

काँग्रेसच्या महत्वाच्या पदावरुन माजी आ. सपकाळ यांच्या गच्छंतीमागे मातृतीर्थ मतदार संघातील घडामोडी ..??



सिंदखेडराजा:- अखिल भारतीय स्तरावर काँग्रेसचे सचिव तसेच गुजरात व मध्यप्रदेश सहप्रभारी असलेले माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची दोन्ही पदावरुन नुकतीच गच्छंती करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस अंतर्गत चर्चांमधून मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाचे महत्वपूर्ण योगदान असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी राहिलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तसेच गुजरात व मध्यप्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी पद नुकतेच काढून घेण्यात आले आहे.
त्याचवेळी जिल्ह्याचे माजी खासदार तसेच केंद्रातील माजी मंत्री मुकुल वासनिक यांचे नावही मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रभारी म्हणून समोर आले आहे.
या घडामोडींच्या काही दिवसांपूर्वीच सिंदखेडराजा मतदारसंघातील समाजमाध्यमावरील एका गृपवर यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यामधील दोघा पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत सपकाळ यांचे भक्त म्हणता येईल असे कट्टर समर्थक तर दुसऱ्या बाजूने वासनिक समर्थक अशी काहीशी वैयक्तिक पातळीपर्यंत जाणारी चर्चा दिसून आली. दोघांच्या चर्चेला काँग्रेस मधील अनेक निष्ठावंत तसेच जुन्या जाणत्यांनी बघितले मात्र आपल्याला काय करायचे? या वृत्तीतून दुर्लक्षित केल्या गेले असे चित्र वरवर दिसून येत असले तरी मुकुल वासनिक यांच्यापर्यंत ह्या चर्चेचा "अथ ते इति" पर्यंतचा गोषवारा त्याचवेळी पोहोचवला गेला होता. 
ह्या चर्चेचे साक्षीदार राहिलेल्या कॉंग्रेसजनांमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थकाने एवढे भडक व एकेरी व्हायला नको होते अशी भावना व्यक्त होत होती. त्यातील काहींनी ह्या गोष्टी संदर्भात 'सपकाळ यांची बाजू घेणाऱ्या कार्यकर्त्यांची कट्टरता वाद तसेच जेष्ठ पदाधिकाऱ्यांबद्दलची एकेरी भावशैली पक्षीय ध्येयधोरणाना बाधक ठरु शकते' आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
 याचवेळी काही सपकाळ समर्थक हे आपल्या नेत्याने राहुल गांधी यांच्या जवळ अगोदरच राजीनामा दिला होता, मात्र तो त्यांनी स्वीकारला नसल्याचे पोस्ट करीत सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
तर काही कार्यकर्ते ह्या घडामोडीतील तथ्य व वास्तव स्वीकारत अंतर्मुख होऊन "नरो वा कुंजरोवा" करीत "अळीमिळी गुपचिळी" साधण्यात मग्न आहेत.
काँग्रेसचे एकंदरीत पक्षीय राजकारण बघता सिंदखेडराजा मतदारसंघ व त्यातल्या त्यात देऊळगावराजा हे एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून मुकुल वासनिकांच्या युवा चळवळीचे झंझावाती केंद्रस्थान होते. १९८० ते १९९६ पर्यंत राज्यातील काँग्रेसचे युवा पदाधिकारी निवडण्याचे त्यांच्या नियुक्त्या देण्याचे काम स्व. सुरेश सोनुने या स्वतःला कार्यकर्ता म्हणविणाऱ्या युवा नेत्याच्या माध्यमातून होत असे. तेंव्हा कार्यक्षम असलेले काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते हे अजूनही जिल्हाभरातच नव्हेतर राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या पटलावर प्रभावी असल्याचे आढळून येते. तसेच त्यांचा पक्षीय संघटनेवर असणारा दबदबा दिसून येत असतो. काँग्रेसमध्ये स्वतःचा सवता सुभा निर्माण करण्याचे षडयंत्र ह्या सुप्त असलेल्या लॉबीने वेळोवेळी हाणून पाडला आहे. माजी आमदार सपकाळ यांची अ. भा. सचिव व राज्यप्रभारी पदावरुन झालेली गच्छंती ही त्याचेच द्योतक असावे, अशीही शक्यता नाकारता येणार नाही.
यासर्व घडामोडीतून यापुढे इतर काहीही फलित निघो अथवा नाही, मात्र यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील काँग्रेस चर्चेत आली, एवढे मात्र निश्चित ..!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा